राज्यातील वादग्रस्त ठरलेल्या चार जिल्हा काँग्रेस अध्यक्षांबाबत लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी रविवारी बोलावलेल्या बैठकीतून स्पष्ट झाले असून विदर्भात तेली समाजाचा एकही जिल्हाध्यक्ष नसल्याची बाब विशेष चर्चिली गेली.
गेल्या रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुंबईत वादग्रस्त प्रकरणांची सुनावणी केली. राज्यातील वर्धा, चंद्रपूर, नाशिक व जळगाव येथील जिल्हाध्यक्षांबद्दल विविध वाद उपस्थित झाले आहेत. पराकोटीला गेलेले हे वाद दिल्ली दरबारीही पोहोचले. त्याच अनुषंगाने पक्षाचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांना याबाबत बैठक बोलावण्यास सांगितले होते. त्याची दखल अखेर प्रदेश पातळीवर घेण्यात आली.                                                                                                                            
रविवारी मुंबईत मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी वादग्रस्त चारही जिल्ह्य़ातील निवडक नेत्यांना पाचारण केले व प्रत्येकाचे मत स्वतंत्रपणे जाणून घेतले. प्रदेश सचिव प्रवीण हिवरे यांनी यास दुजोरा दिला. चंद्रपूरहून माजी खासदार नरेश पुगलिया यांचा गट, तसेच सुभाष धोटे, विजय वडेट्टीवार व संजय देवतळे यांचा दुसरा गट हजर झाला होता. विनायक बांगडे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेबाबत स्पर्धा सुरू आहे. धोटे-वडेट्टीवार यांनी बांगडे यांचेच नाव पुढे रेटले, तर नरेश पुगलिया यांनी दुसरे नाव पुढे केले. पुगलिया यांनी सोबत नेलेल्या महापौरांना ते निमंत्रित नसल्याने मत व्यक्त करण्याची संधी मिळाली नाही.
वध्र्याचे जिल्हाध्यक्ष प्रा. किरण उरकांदे यांना विरोध आहे. या बैठकीत खासदार दत्ता मेघे, राज्यमंत्री रणजीत कांबळे व राजेंद्र मुळक, माजी आमदार अमर काळे, शेखर शेंडे व प्रवीण हिवरे यांनाच निमंत्रित करण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष प्रा.उरकांदे हे शासन अनुदानित खाजगी कनिष्ठ महाविद्यालयात असल्याने अपात्र ठरतात. उच्च न्यायालयाने नागपूरच्या एका प्रकरणात अशा शिक्षकांना राजकीय पदावर राहणार येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करावी, असे स्पष्ट करीत खासदार गटाने न्यायालयाचा निकालच पुराव्यार्थ सादर केला. मुख्यमंत्र्यांनी तो ठेवून घेत नवे नाव सुचविण्यास सांगितले. प्रत्येकास स्वतंत्र वेळ दिली. त्याच वेळी नाव सांगण्याचे आदेश निघाल्याने मेघे-मुळक-शेंडे यांनी प्रवीण हिवरेंचे नाव सुचविले. खासदार गटाने आपले नाव असे पक्के केले. दुसरीकडे नामदार रणजीत कांबळे यांच्याशी संपर्क न होऊ शकल्याने त्यांची भूमिका कळू शकली नाही.
विदर्भात तेली समाजाचा एकही जिल्हाध्यक्ष काँग्रेसने दिलेला नाही. या भागात लक्षणीय संख्येने असलेल्या व राजकीयदृष्टय़ा संवेदनशील असलेल्या या समाजास पक्षांतर्गत ठळक प्रतिनिधित्व देणे आवश्यक असल्याचे मत याच बैठकीत व्यक्त झाले. या चारही जिल्ह्य़ाबाबत मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी एक घाव दोन तुकडे, अशी भूमिका घेतल्याने याबाबत लवकरच निर्णय लागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.