प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न घेऊन समाजकारणात उतरलेले अनेक नेते आज उमेदवार म्हणून निवडणुकीच्या बोहल्यावर चढल्याने मतदान करायचे कोणाला, असा प्रश्न नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पडला आहे. बेलापूर व ऐरोली या दोन मतदारसंघांतील चार प्रमुख पक्षांचे सहा उमेदवार हे प्रकल्पग्रस्त आहेत. त्यात प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही निवडणुकीच्या आखाडय़ात उतरण्याची लहर आल्याने प्रकल्पग्रस्तांच्या मतांत मोठय़ा प्रमाणात विभागणी होणार आहे. पनवेल, उरण मतदारसंघांतही प्रकल्पग्रस्त उमेदवारांचा वरचष्मा आहे. जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी ठेवलेल्या उमेदवारांनी नामसाधम्र्य असलेल्या अनेक प्रकल्पग्रस्तांना निवडणुकीत उतरवले आहे.
नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर मतदारसंघांत एकूण ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश नाईक, संदीप नाईक हे प्रकल्पग्रस्त आहेत, तर काँग्रेसने उमेदवारी दिलेले दोन्ही उमेदवार अनुक्रमे रमाकांत म्हात्रे, नामदेव भगत हेही प्रकल्पग्रस्त आहेत. याशिवाय नवी मुंबईत भाजप पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मैदानात उतरलेले मंदा म्हात्रे व वैभव नाईक हे मूळ राष्ट्रवादी असलेले स्थानिक नेते प्रकल्पग्रस्त आहेत. केवळ शिवसेनेचे विजय चौगुले व विजय नाहटा हे दोन उमेदवार परगावातील आहेत. चौगुले यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करून आता आठ वर्षांचा कालावधी लोटला आहे; पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी पटकावणाऱ्या नाहटा यांच्याबाबतीत ‘कानामागून आले आणि तिकीट झाले’ अशी चर्चा सेनेत आहे. या चार प्रमुख पक्षांतील सहा उमेदवार प्रकल्पग्रस्त असताना सिडको आणि एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे पदाधिकारी डॉ. राजेश पाटील व मनोहर पाटील यांनीही निवडणूक मैदानात उतरून जनाधार शोधण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवू शकणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहायचे सोडून निवडणूक लढण्याची अवदसा या पदाधिकाऱ्यांना सुचल्याने प्रकल्पग्रस्त नाराज आहेत. या प्रकल्पग्रस्तांशिवाय मारुती भोईर, रवींद्र पाटील यांच्यासारखे डझनभर प्रकल्पग्रस्त उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे मतदान विभागले जाणार असून कोणता झेंडा घेऊ हाती, असा प्रश्न प्रकल्पग्रस्तांना पडला आहे.
वाढलेल्या मतदानावर उमेदवारांची नजर
नवी मुंबईत लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या मतदार नोंदणीत ३९ हजार ६८१ मतदार वाढले असून एकूण मतदान सात लाख ९० हजार १७९ झाले आहे. त्यात ऐरोली विधानसभा मतदारसंघात ६७ हजार मतदार वाढले असून आता ही संख्या चार लाख ८ हजार १०३ एवढी झाली आहे. बेलापूर मतदारसंघातही हीच स्थिती असून लोकसभा निवडणुकीनंतर पाच हजार ६९२ मतदार वाढले. त्यामुळे ही संख्या तीन लाख ८२ हजार ७६ झाली आहे. यात तरुणाईचे मतदान जास्त असल्याने ते कोणाच्या पारडय़ात पडणार याची चर्चा सुरू आहे.