येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत ‘आप’ कडून लढण्यास विदर्भातील अनेक नेते इच्छूक असले तरी नक्षलवाद, स्वतंत्र राज्य व आरक्षणासारख्या महत्त्वाच्या मुद्यावर या पक्षाची भूमिका काय, असा प्रश्न आता या इच्छूकांना छळू लागला आहे.
राजधानी दिल्लीत सत्ता स्थापन केल्यामुळे केजरीवालांच्या आम आदमी पक्षाचा भाव सध्या चांगलाच वधारला आहे. सध्या या पक्षाकडून राबवण्यात येत असलेल्या सदस्यता नोंदणी मोहिमेला विदर्भातही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. या पाश्र्वभूमीवर येत्या लोकसभा व नंतर विधानसभेच्या निवडणुकांकडे डोळे लावून बसलेल्या विदर्भातील अनेक नेत्यांनी सध्या आपशी हातमिळवणी करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. या नेत्यांची आपकडून लढण्याची इच्छा असली तरी विदर्भात निवडणुकीच्या काळात महत्त्वाच्या ठरणाऱ्या मुद्यांवर या पक्षाची भूमिका काय, असा प्रश्न आता या इच्छूकांना पडला आहे. विदर्भात नक्षलवादाचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रश्नावर जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांची भूमिका समान आहे. देशभर निवडणूक लढण्याची भाषा करणाऱ्या आपने मात्र या प्रश्नावर अद्याप मौन धारण केले आहे. या पक्षाचे नेते व ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी नक्षलवादग्रस्त भागात सुरक्षा दलांच्या उपस्थितीच्या मुद्यावर जनमत घ्यावे, अशी वादग्रस्त मागणी केली आहे. भूषण यांची या प्रश्नावरची भूमिका आरंभापासून वेगळी आहे. कायम नक्षलवाद्यांच्या बाजूने बोलणारे भूषण त्यांनी केलेल्या हिंसाचाराच्या मुद्यावर मात्र नेहमी गप्प राहतात. नेमकी हीच अडचणीत आणणारी बाब आहे, असे विदर्भातील नेत्यांचे म्हणणे आहे. सध्या विदर्भात ओबीसींच्या आरक्षणाचा, तसेच शैक्षणिक सवलतीचा प्रश्न चर्चेत आहे. आपची या प्रश्नावरची भूमिकाही गुलदस्त्यात आहे. केजरीवाल हे आरक्षणाला व्यापार हाच पर्याय आहे, अशी भूमिका मांडतात. विदर्भात ही भूमिका स्वीकारली जाणे शक्य नाही, असे नेत्यांचे म्हणणे आहे. मध्यंतरी शेतकरी संघटनेचे नेते अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी दिल्लीत झालेल्या धरणे कार्यक्रमाला केजरीवालांनी हजेरी लावली होती. मात्र, अजूनही या पक्षाने स्वतंत्र राज्यांच्या बाबतीत स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. आता निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या पक्षाला भूमिका मांडावी लागेल, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. अॅड. चटप व आपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये निवडणूक लढण्याच्या संदर्भात प्राथमिक स्तरावर बोलणी झालेली आहे. या चर्चेच्या वेळीही आपने या मुद्यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती विदर्भातील नेत्यांनी केली होती. आता आपकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे या नेत्यांचे लक्ष लागले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2014 रोजी प्रकाशित
विदर्भातील इच्छुक नेत्यांना ‘आप’च्या भूमिकेची प्रतीक्षा
येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत ‘आप’ कडून लढण्यास विदर्भातील अनेक नेते इच्छूक असले तरी नक्षलवाद, स्वतंत्र राज्य व आरक्षणासारख्या
First published on: 22-01-2014 at 08:27 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbha enthusiastic leaders waits for aap role on several issues