येथे ८ व ९ फेब्रुवारीला होणार असलेल्या बाराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका जाहीर करण्यात आली. डॉ. श्रीराम गुंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचे उद्घाटन डॉ. अजीज नदाफ यांच्या हस्ते होईल. परिसंवाद, गटचर्चा, नाटय़प्रयोग, कविसंमेलन, विद्रोही शाहिरी जलसा आदी कार्यक्रम होणार आहेत.
शनिवारी (दि. ८) सकाळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मदानावर उद्घाटन होईल. माजी संमेलनाध्यक्ष ऊर्मिला पवार, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. आ. ह. साळुंखे, कवी तुळशी परब, संजय पवार, तसेच दादासाहेब मोरे, अविनाश डोळस, ज्ञानेश महाराव, अनसूयाबाई िशदे, भ. मा. परसवाळे आदी उपस्थित राहणार आहेत. सकाळी साडेआठ वाजता समता िदडी, ग्रंथदालन व चित्रनगरीचे संमेलनाध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन होईल. बशर नवाज, शेषराव देशमुख, बी. एच. सहजराव, राणूबाई वायवळ, व्ही. के. जावळे यांना विद्रोही जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
उद्घाटनानंतर ‘मी सावित्रीबाई फुले बोलतेय’ हा नाटय़प्रयोग होईल. ‘परिवर्तनवादी साहित्यप्रवाह जनतेशी नाळ तुटल्याने विद्रोहाशी फारकत घेऊन दिशाहीन होत आहे’ या विषयावर दादासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात डॉ. प्रतिभा येरेकर (नांदेड), अशोक आडसूळ (मुंबई), किशोर ढमाले (धुळे), प्रा. रामदास तौर (नांदेड), फ. म. शहाजिंदे (लातूर) सहभागी होतील. डॉ. प्रकाश मोगले यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ५ वाजता कविसंमेलन, यानंतर ‘आंबेडकरवाद आणि सांस्कृतिक क्रांतीची दिशा’ या विषयावर प्रा. अविनाश डोळस यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद, कविसंमेलनानंतर शाहीर अनसूयाबाई िशदे यांच्या अध्यक्षतेखाली विद्रोही शाहिरी जलशाचा कार्यक्रम होईल.
रविवारी (दि. ९) संघर्षशील आदिवासी लोककला, गटचर्चा, पत्रकार ज्ञानेश महाराव यांच्या अध्यक्षतेखाली ‘स्त्रीविरोधी िहसा, परशुराम ते आसाराम’ या विषयावरील परिसंवादात अॅड. मुक्ता दाभोलकर (सातारा), प्रा. निशा शेंडे (अमरावती), कॉ. स्मिता पानसरे (नगर), डॉ. दिलीप चव्हाण (नांदेड) सहभागी होतील. ‘शोषित दलित जाणिवा आणि भारतीय चित्रकलेची वाटचाल’ विषयावर चित्रकार भ. मा. परसावळे यांचे भाषण, संतोष पवार यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन, दुष्काळ व पाण्यावरील मराठी साहित्य व मराठी साहित्य किती खोल पाण्यात हा परिसंवाद प्रा. संध्या रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. आसाराम लोमटे, भीमराव हटकर, सुहास काकुस्ते, दिनकर साळवे, किशोर जाधव हे यात सहभागी होतील. समारोप सत्राचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ जगदेव, तर डॉ. जगदीश सितारा, मा. रा. लामखडे आदींची उपस्थिती असेल. बालसंवाद, बालनाटय़, लघुचित्रपट आदी कार्यक्रम होणार आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे प्रा. प्रतिमा परदेशी, सिद्धार्थ जगदेव, किशोर ढमाले, स्वागताध्यक्ष भाई लक्ष्मणराव गोळेगावकर, कार्याध्यक्ष यशवंत मकरंद, खजिनदार प्राचार्य विठ्ठल घुले आदींनी केले आहे.