मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक ऊसाला चांगला भाव देण्याची अपेक्षा सरकारकडून कशी करतात? असा बोचरा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केला असून ऊसासाठी चाललेले आंदोलन केवळ स्वत:चे वर्चस्व सिद्ध करण्यासाठीच आहे, अशी टीका केल्याने शेतकरी आंदोलनात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात उसाच्या दरावरून हिंसक आंदोलन पेटले आहे. खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात चाललेल्या या आंदोलनाद्वारे ऊसदराबाबत राज्य शासनालाच जाब विचारला जात आहे. मुख्यमंत्री व शेतकरी नेत्यांदरम्यानच्या वाटाघाटी फि स्कटल्यानंतर आता पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पाश्र्वभूमीवर पहिल्यांदाच ‘लोकसत्ता’शी बोलताना जावंधिया यांनी आंदोलन करणाऱ्या नेत्यांची भूमिका पूर्णत: चुकीची असल्याचे सांगून टीकास्त्र सोडले.
जावंधिया म्हणाले, ऊसदराबाबत आंदोलन करणारे नेते खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थक आहेत. मग यात शासनाची भूमिका येतेच कु ठे? आता तर ते परदेशी गुंतवणुकीचेही खुले स्वागत केले जात आहे. त्यामुळे मग साखरेवर आयात करही नक ो. पण हा कर असल्याने देशांतर्गत भाव पडले नाहीत. आज शासन बाजारातील साखरेचे दर नियंत्रित ठेवते. गतवेळी विक्रमी उत्पादन झाले तेव्हाही ३० रुपये प्रति किलोचा भाव शासनाने नियंत्रित केला. आता जगात भाव जास्त पण देशात कमी आहे. मग हे नेते निर्यात करा व चांगला भाव मिळू द्या, असे का म्हणत नाहीत? कारण मिळणार नाही, हे त्यांना माहीत आहे. दहा टक्के आयातकर आता २० टक्के करण्याचा विचार आहे. म्हणजे ऊस उत्पादकांना परत मोठे सुरक्षाकवच मिळणार.
आता रघुनाथदादा पाटील यांच्या म्हणण्यानुसार रंगराजन जमिनीचा अहवाल लागू करा. जो भाव मिळेल तो मान्य करू. परंतु रघुनाथदादांची ही भूमिका पूर्णत: चुकीची आहे. कारण त्यामुळे ऊस उत्पादक वाऱ्यावर सोडला जाईल. २३०० रूपयाचा भाव देऊन समाधान नाही. केवळ २५०० रूपये भाव मिळण्यासाठी एवढे तीव्र आंदोलन करण्याची गरज नाही. यात ऊस उत्पादक शेतकरी नाहक बळी जात आहे. शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी २० वर्षांपूर्वी जसा शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. तसाच प्रकार आताच्या भूमिकेने होऊ शकतो. त्यांनी आता तरी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचं राजकारण करण्यापेक्षा या कळवळा दाखविणाऱ्या नेत्यांनी मुळात शेतकऱ्यांच्या आर्थिक धोरणाबाबत ठाम भूमिका घेण्याची गरज आहे. मात्र तसे होणार नाही, असे निदर्शनास आणत जावंधिया यांनी हे नेते केवळ स्वत:चे नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.