भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांना बंद पाईपमधूनच पिण्याचे पाणी द्यावे अशी मागणी  कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
विखे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भंडारदरा धरणातून प्रवरा नदी व कालव्याद्वारे लाभक्षेत्रातील अनेक गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी एकत्रित आवर्तन घेतले जाते. तथापि संगमनेर, श्रीरामपूर, कोल्हार, बाभळेश्वर, लोणी आदी मोठय़ा लोकसंख्येच्या गावांना पाणी टंचाईची झळ बसू नये म्हणून कधी कधी पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र आवर्तन करावे लागते. त्यात होणारी गळती, अवैध उपसा, पाझर इत्यादी कारणांमुळे मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा नाश होतो.
हे पाणी उघडय़ा मार्गाने येत असल्याने नदीकाठावरील गावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर दुषित होते. छोटय़ा ग्रामपंचायतींकडे जलशुद्धीकरण यंत्रणा नसल्याने नागरीकांना होणारा पाणीपुरवठा शुद्धीकरण न करताच केला जातो. राजूर परिसरातील गावे व संगमनेर शहराला निळवंडे धरणातून बंद पाईपने पाणीपुवठा करण्याचे प्रयत्न सुरु झालेले आहे. याचप्रकारे भंडारदरा धरणावर अवलंबून असणाऱ्या सर्वच गावांना बंद पाईपद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. लाभक्षेत्र खालच्या भागात असल्याने प्रवाही पद्धतीने पाणी जाईल. त्यामुळे सर्व गावांचा विजबिलाचा प्रश्नही संपुष्टात येवू शकेल. वीज बिल, देखभाल व दुरुस्तीचा खर्च कमी झाल्याने नागरीकांचीसुद्धा पाणीपट्टी कमी होईल असेही विखे यांनी या निवेदनात म्हटले आहे.