भारुड, कीर्तन, अभंग, वाघ्यामुरळी या लोककलांनी ग्रामीण जीवन सुसंस्कृत, समृद्ध केले. त्यामुळे सांप्रदायाचा समाजमनावर प्रभाव आहे. मराठी माणसाची संस्कृती लोककलेवर टिकून असून, माणसाच्या कर्तृत्वाला गाव, प्रदेशाची मर्यादा नसते. ते खणखणीत नाणे असते. त्याचा नाद सर्वदूर पोहोचतो. नाटय़ दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी सुरू केलेला भारुड महोत्सव भविष्यात महत्त्वाचा ठरेल, असे मत अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी व्यक्त केले.
जिल्ह्य़ातील दरडवाडी (तालुकाकेज) येथे वामन केंद्रे यांनी सुरू केलेल्या दुसऱ्या तीन दिवसीय राष्ट्रीय भारुड महोत्सवाचा समारोप झाला. त्या वेळी टाकसाळे बोलत होते. कीर्तनकार वाभळेमहाराज, नाटय़ समीक्षक जयंत पवार, नाटय़ कलावंत डॉ. सतीश साळुंके, अभिनेत्री गौरी केंद्रे यांच्यासह राज्यभरातून आलेले भारुडकार, कलावंत या वेळी उपस्थित होते. टाकसाळे म्हणाले, की माणसाच्या कर्तृत्वाला प्रदेशाची, गावाची किंवा विभागाची मर्यादा येत नाही. त्याचा नाद सर्वदूर पोहोचतो. कारण ते खणखणीत नाणे असते. माणसाचा खरा धर्म आपले कर्तृत्व आहे. कर्तृत्वाप्रमाणे काम करणे हेच धर्माचे पालन आहे. ग्रामीण भागात माणुसकी, संस्कृती का टिकून आहे, याचे उत्तर मिळवायचे असेल, तर दरडवाडीत यावे लागेल, असे सांगून भारुड, कीर्तन, अभंग, गौळण, वाघ्यामुरळी या लोककलांनीच ग्रामीण जीवन सुसंस्कृत केले आहे. आजही वारकरी सांप्रदायाचा समाजमनावर प्रभाव आहे. त्यामुळे डॉ. वामन केंद्रे यांनी सुरू केलेला भारुड महोत्सव भविष्यात महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जयंत पवार या वेळी म्हणाले, की मुंबईत लोकमहोत्सव होतात. मात्र, त्यात कृत्रिमपणा असतो. अस्सल मातीतील कला ही दरडवाडीत पाहता आली. भारुडाने झपाटलेले गाव पाहता आले. प्रास्ताविक करताना डॉ. वामन केंद्रे म्हणाले, भारुड महोत्सवामुळे भविष्यात दरडवाडी हे गाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात अधोरेखित होईल. या पारंपरिक लोककलेचे अभ्यास केंद्र उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. महोत्सवाच्या निमित्ताने एक हजार भारुड कलावंत गावात आले. त्यांच्याबरोबर लोककलेचे समीक्षक व विचारवंतांनी व्यासपीठावर येऊन चिकित्सा केली. त्यामुळे हा महोत्सव आता सर्व दूर जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन नाटय़कलावंत डॉ. सतीश साळुंके यांनी केले. भारुड महोत्सव यशस्वीतेसाठी राम दराडे यांनी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला.
महोत्सवात राज्यभरातील साडेनऊशे कलावंत व भारुड मंडळांनी सहभाग नोंदवला. महोत्सव समितीने उत्कृष्ट वैयक्तिक सादरीकरणाबद्दल भानुदास बैरागी व पद्मजा कुलकर्णी यांची निवड केली. उत्कृष्ट गायक भारुडकार म्हणून कैलास साबळे व वादक जगन्नाथ खरात व नृतक केशव कवडे यांची निवड करण्यात आली. सांघिक कला प्रकारातून उत्तेजनार्थ पारितोषिक संत ज्ञानेश्वर मंडळ (खंडेश्वरी, ता. कळंब), भानुदास बैरागी मंडळ (कोपरगाव), संत विश्रामबाबा भजनी मंडळ (औरंगाबाद), संत एकनाथ भारुड मंडळ (कोपरगाव), दरवाडी भारुड मंडळ व जागृती मंडळ (पंढरपूर) यांची घोषणा करण्यात आली.