नवी मुंबई पालिकेच्या मालकीचे वाशी येथील विष्णूदास भावे नाटय़गृह १७ फेबुवारी पासून दीड महिने डागडुजीसाठी अल्पविराम घेणार आहे. १७ फेबुवारीला रात्री उशिरा मोरुची मावशीचा शेवटचा प्रयोग होणार आहे. मुंबई, ठाण्यात नाटय़प्रयोग करण्यासाठी एकापेक्षा जास्त नाटय़गृह आहेत पण नवी मुंबईत हे एकमेव सरकारी नाटय़गृह असल्याने नाटय़रसिकांना दीड महिना नाटकांपासून वंचित रहावे लागणार आहे.
वाशी सेक्टर १६ येथे मोक्याच्या ठिकाणी (बस आगारासमोर) बांधण्यात आलेले भावे नाटय़गृह हे सिडकोने १८ वर्षांपूर्वी १६ कोटी रुपये खर्च करुन बांधलेले देशातील एक सर्वोत्तम नाटय़गृह मानले जाते. फिरत्या रंगमंचाचा पहिला प्रयोग या नाटय़गृहात करण्यात आल्याने अनेक नाटय़ कलाकरांची या नाटय़गृहात एखादा तरी प्रयोग करण्याची इच्छा असल्याचे मानले जाते. पालिका स्थापनेनंतर एका सहा वर्षांत पालिकेने ही चांगली वास्तू स्वत:कडे मागून घेतली. युती शासनाच्या काळात ती तात्काळ देण्यात आली. नफा देणारा प्रकल्प नसल्याने पालिकेने त्यानंतर या वास्तूकडे विशेष लक्ष दिले नाही. त्यामुळे वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना मानला गेलेल्या या नाटय़गृहाची मागील गेल्या १७ वर्षांत कधी म्हणावी तसी डागडुजी झाली नाही. त्यामुळे ऐन प्रयोगाच्या वेळी रंगमंचावर पावसाच्या धारा पडण्याच्या घटना मागील वर्षी घडल्या. नाटक बघता बघता डास मारण्याचे प्रयोग देखील रसिकांना करावे लागत होते तर नाटय़गृहातील साधे घडय़ाळ देखील सुट्टीवर गेल्याचे दृश्य होते. त्यामुळे या नाटय़गृहाची प्राधान्याने डागडुजी करणे गरजेचे असल्याची नाटय़रसिकांची मागणी होती. त्यामुळे पालिकेने सुमारे एक कोटी ६२ लाख रुपये खर्चाची डागडुजीचे काम हाती घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी १७ फेबुवारीपासून भावे नाटय़गृह ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. वास्तविक ही डेडलाईन १६ नोव्हेबंर ठरविण्यात आली होती पण मोरुची मावशी आणि जन्मरहस्य यासारख्या नाटय़प्रयोगांना द्याव्या लागणाऱ्या तारखा यापूर्वी बदलण्यात आल्या होत्या. त्या बदल्यात हा एक दिवस वाढविण्यात आला आहे. डागडुजीच्या कामाला सुरुवात करतानाच गुरुवारी २० फेब्रुवारीला पालकमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार होणार आहे. एक कोटी ६२ लाखाच्या या कामात नाटय़गृहाच्या छप्पराची दुरुस्ती केली जाणार असून परिसरातील डांबरीकरण केले जाणार आहे. भावे नाटय़गहात काही सांस्कृतिक किंवा राजकीय कार्यक्रमांच्या वेळी होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेऊन या ठिकाणी एक मजली पार्किग उभारण्याचा पालिकेचा मानस आहे मात्र हे काम पुढील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या वेळी वाहनांची गर्दी रस्त्यावर येते. त्यामुळे या मुख्यरस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. दुरुस्तीच्या या कामात भावे नाटय़गहाचे मुख्य काम असणाऱ्या खूच्र्याची दुरस्ती काढण्यात आलेली नाही. चार वर्षांपूर्वी सुमारे ८० लाख रुपये खर्च करुन पालिकेने या खूच्र्या नव्याने लावल्या आहेत. त्यांची दुरावस्था पुन्हा झाली आहे. सभागृहातील दहा बारा खूच्र्यावर प्रेक्षकांना बसणे मुश्किल आहे. नाटय़गृहाचे मुख्य काम असणाऱ्या या खूच्र्याची या काळात डागडुजी होणे आवश्यक असल्याचे मत प्रेक्षकांनी व्यक्त केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Feb 2014 रोजी प्रकाशित
‘विष्णूदास भावे’मध्ये दीड महिन्यांचा मध्यंतर
नवी मुंबई पालिकेच्या मालकीचे वाशी येथील विष्णूदास भावे नाटय़गृह १७ फेबुवारी पासून दीड महिने डागडुजीसाठी अल्पविराम घेणार आहे. १७ फेबुवारीला रात्री उशिरा मोरुची मावशीचा शेवटचा प्रयोग होणार आहे.
First published on: 12-02-2014 at 08:48 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishnudas bhave theatre closed for month