डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना युनिव्हर्सिटी टिचर्स असोसिएशन या प्राध्यापक संघटनेच्या वतीने व्हिजन-२०५६ व आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेचे २२ व २३ मार्चला राजीव गांधी कामगार भवनात आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती परिषदेचे संयोजक डॉ. इसादास भडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे धम्माचा स्वीकार केला. याला २०५६ मध्ये शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. याचे औचित्य साधून शंभर वर्षांतील होणाऱ्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, साहित्यिक, औद्योगिक, प्रसार माध्यमे, इलेक्ट्रॉनिक्स, शिक्षण व महिला या अनुषंगाने या परिषदेत वेध घेण्यात येणार आहे. या परिषदेचे उद्घाटन २२ मार्चला सकाळी १०.३० वाजता भन्ते अयुरपलिये रतन थेरो यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेचे बीजभाषण भन्ते सुगवपंस महाथेरो यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भन्ते बोधिप्रिय महाथेरो, भिक्खु विनय बोधीप्रिय थेरो, देवयानी खोब्रागडे, माजी प्रधान सचिव उत्तम खोब्रागडे, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, आमदार नाना शामकुळे, डॉ. विजय आईंचवार उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १.३० वाजताच्या पहिल्या सत्रात प्रसिद्ध साहित्यिक डॉ. आ.ह. साळुंखे यांचे ‘धम्म स्वीकाराची शतकपूर्ती जागृती कृती योजना’, या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ३ वाजता भन्ते बोधीप्रिय महाथेरो यांचे ‘व्हिजन-२०५६’ यावर आणि ४.१५ वाजता डॉ. निवेदिता वर्मा यांचे ‘शैक्षणिक क्षेत्रात महिलांचे योगदान’ यावर संशोधनपर मार्गदर्शन होणार आहे. सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध गायक अनिलकुमार खोब्रागडे यांचा गीतगायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. २३ मार्चला सकाळी ९ वाजता नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. संघमित्रा आचार्य यांचे युवकासंदर्भात, सकाळी १० वाजता देवयानी खोब्रागडे यांचे ‘राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात महिलांचे योगदान’ या विषयावर, तर किशोर गजभिये यांचे ‘बहुजनांची आर्थिक स्थिती समस्या व उपाय’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
दुपारी १ वाजता भन्ते वेन अनुरपलिये रतन थेरो यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेचा समारोप आयोजित केला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भन्ते सुगतवंस महाथेरो, प्रधान सचिव अनंत खडसे, माजी खासदार नरेश पुगलिया व गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते उपस्थित राहणार आहेत. या निमित्त व्हिजन-२०५६ या नावाची आयएसबीएन हा नंबर असलेली स्मरणिका प्रकाशित करण्यात येईल. या आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधकांनी, प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे संयोजक डॉ. इसादास भडके यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला प्रा. सुधाकर पेटकर व संघटक सचिव प्रा. प्रमोद शंभरकर उपस्थित होते.