अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने वर्षभर राज्यातील ग्रंथालयांना भेट देऊन वाचकांची अभिरुची जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याचा मनोदय डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी शनिवारी येथे प्रकट मुलाखतीदरम्यान व्यक्त केला.
जिल्हा माहिती कार्यालय आणि मराठी ग्रंथसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्रंथोत्सव-२०१३’च्या उद्घाटनानंतर कवी अरुण म्हात्रे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीदरम्यान कोतापल्ले यांनी विविध विषयांसंदर्भातील मते व्यक्त केली.
सामाजिक भान असणाऱ्या राजकीय व्यक्तिमत्त्वांनी साहित्य संस्कृती क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याचा इतिहास आहे. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांनी भाषा संचालनालय, साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ अशा विविध सस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची पायाभरणी केली. त्यामुळे सरसकट सर्वच राजकारणी व्यक्तींनी साहित्याच्या प्रांतात लुडबूड करू नये असे म्हणणे योग्य होणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.  
सध्या महाराष्ट्रातील वाचक नेमके काय वाचतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. वाचकांच्या अभिरुचीचा शोध घेण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणच्या ग्रंथालयांना भेट देण्याचा विचार आहे. वर्षभरात मी हे काम करू शकलो तर माझ्या संमेलनाध्यक्षपदाचे सार्थक झाले, असे मी समजेन, असेही ते म्हणाले. जे जे परंपरेने चालत आलेले आहे, ते देशी आणि पर्यायाने चांगले आहे, असे भालचंद्र नेमाडे म्हणतात. मात्र परंपरेच्या धर्माला आव्हान देतच विज्ञानाचा विस्तार झाला आहे, हे विसरता येत नाही. त्यामुळे नेमाडे यांची विधाने बारकाईने तपासून घ्यायला हवीत, असाही मुद्दा त्यांनी मांडला.