आज संवेदना संपलेल्या लोकांची संख्या वाढत आहे. सामान्य माणूस स्वत:चा आणि त्याच्या कुटुंबापुरताच विचार करतो. देश आणि देशहीत हे त्याच्या मनालाही शिवत नाही. अशा परिस्थितीत स्वामी विवेकानंदांचे विचार बलवर्धक ठरू शकतात. स्वामी विवेकानंद देशाला पडलेले एक सोनेरी सुंदर असे स्वप्न  होते, असे मत विवेकानंद विचारांचे अभ्यासक अ‍ॅड. मदन सेनाड यांनी व्यक्त केले.
स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समितीच्या वतीने स्थानिक नूतन कन्या शाळेने येथील बहिरंगेश्वर मंदिर परिसरात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. जाहीर कार्यक्रमापूर्वी शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी शहरातून शोभायात्रा काढली. स्वामी विवेकानंदांच्या पेहरावातील काही विद्यार्थी शोभायात्रेचे आकर्षण होते. स्थानिक नूतन कन्या, नूतन महाराष्ट्र, महिला समाज, जेसीस कॉन्व्हेंट, जिजामाता शाळा, फिरोज प्राथमिक शाळा यांच्या विद्यार्थ्यांनी शाळेपासून कार्यक्रम स्थळापर्यंत काढलेल्या शोभायात्रेमुळे सकाळच्या वेळी शहरातील वातावरण विवेकानंदमय झाले होते. सर्व शाळांचे विद्यार्थी एकत्रित आल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे माजी अध्यक्ष वसंतराव गुर्जर होते.
प्रमुख वक्ते म्हणून अ‍ॅड. मदन सेनाड, प्रमुख अतिथी स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समिती विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य चिंतामण मेहर, नूतन कन्या शाळेच्या प्राचार्य दीप्ती कुरोडे, समितीचे जिल्हा संयोजक धनंजय मोहोकर होते. नूतन कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी शारदास्तवन सादर केले. त्यानंतर प्रास्ताविक करताना जिल्हा समितीचे संयोजक धनंजय मोहोकर यांनी वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमांविषयी माहिती दिली. अ‍ॅड.सेनाड म्हणाले, स्वामी विवेकानंदांच्या विचाराने जीवनात आमूलाग्र बदल घडून येऊ शकतो. आज प्रत्येक जण स्वत:चा विचार करतो, त्यामुळेच आपण सामान्य माणूस जेव्हा देशाच्या भल्यासाठी विचार करू लागतो, मात्र सामान्य माणूस जेव्हा देशाच्या भल्यासाठी विचार करू लागतो तो असामान्य होतो. स्वामी विवेकानंद हे असामान्य व्यक्तिमत्व होते.  कार्यक्रमाचे अध्यक्ष गुर्जर यांनी विद्यार्थ्यांना एकदा तरी स्वामींच्या कन्याकुमारी येथील स्मारकाला भेट देण्याचे आवाहन केले. चिंतामण मेहर यांनी वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमांना सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी नूतन कन्या शाळेच्या राधिका राजाभोज या विद्यार्थिनीने स्वामीजींच्या वेशात येऊन त्यांच्या शिकागो येथे झालेल्या भाषणाच्या काही ओळी म्हणून दाखविल्या. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका मोहरील यांनी केले.