कामोठे शहरातील रहिवाशांसाठी एनएमएमटीची बससेवा सुरू करण्यासाठी पोलीस, तहसील कार्यालय आणि एनएमएमटी प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे कामोठय़ातील सुमारे १५ हजार प्रवाशांची बससेवेची प्रतीक्षा संपणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ही बससेवा सुरू करण्यासाठी प्रशासनातून हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीदरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाने या बससेवेचा प्रचारात उपयोग करू नये यासाठी लोकहिताचा हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. 

कामोठेकर गेल्या पाच वर्षांपासून या बससेवेच्या प्रतीक्षेत आहेत. कामोठे रहिवासी संघाच्या सदस्यांनी ही बस सुरू होण्यासाठी स्वाक्षरी मोहीम घेतली. त्यानंतर निवडणुकीपूर्वी बस शहरात सुरू करण्यासाठी निवडणूक बहिष्काराचे हत्यार उपसले होते. याबाबत पोलीस उपायुक्त संजय येनपुरे आणि साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांनी नुकतीच यासंदर्भात कामोठे शहरातील तीन आसनी रिक्षाचालकांची बैठक बोलावली होती. शहरात बस सुरू झाल्याने तीनआसनी रिक्षांना उपासमारीची वेळ येणार नसल्याचे यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांना पटवून दिले.
एनएमएमटीची बस सेवा निर्भय वातावरणामध्ये सुरू होण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. बस सुरू झाल्यास मानसरोवर आणि खांदेश्वर रेल्वेस्थानकांतील प्रवाशांना कळंबोली, कामोठे, खांदेश्र्वर शहरांसहीत सायन-पनवेल महामार्ग या ठिकाणी जाणे सोयीचे होणार आहे. तसेच या बसमुळे रोडपाली सेक्टर १७, पोलीस मुख्यालय, नावडे नोड, तळोजा एमआयडीसी परिसरातील प्रवाशांना बससेवा मिळणार आहे.
सध्या रोडपाली ते उरण या पल्ल्यासाठी एनएमएमटीची ३० क्रमांकाची बस धावते. एनएमएमटी प्रशासन ३० क्रमांक बसचे मार्ग वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या रोडपाली ते सीबीडी स्थानकापर्यंत प्रवाशांना १५ रुपये मोजून प्रवास करावा लागतो.
शहरातील लोकआग्रहास्तव, हितास्तव पोलीस संरक्षणात बससेवा सुरू करू, असेसाहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी याबाबत सांगितले. काही वर्षांपूर्वी येथील तीन आसनी रिक्षाचालकांनी एनएमएमटी बसला विरोध केला होता. आता तीन वर्षांनी ही परिस्थिती बदलली आहे.
लोकहिताच्या या बससेवेला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. एनएमएमटी प्रशासनाने याबाबत निर्भयता बाळगावी. एनएमएमटीने आम्हाला कधी बस सुरू करतोय. त्याचे वेळापत्रक, तयारी आणि फेऱ्या कळवाव्यात. वेळीच ही बससेवा पोलीस संरक्षणात शहरात लोकआग्रहास्तव आणि हितास्तव सुरू करू.
तळोजा एमआयडीसी येथून रोडपाली लिंकरोड ते सीबीडी बेलापूर स्थानकात जाणारी बससेवा एनएमएमटी प्रशासन सुरू करण्याच्या विचाराधीन असल्याचे एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आधरवाड यांनी सांगितले.