ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव वेळेवर न पाठवल्याच्या निषेधार्थ छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील बिंदूमाधव बाळासाहेब ठाकरे डीटीएड महाविद्यालयाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
छात्रभारतीचे जिल्हाध्यक्ष केदार भोपे, अमोल दहातोंडे, योगेश भानगुडे, विकास शिरसाठ आदींकडे याबाबत काही विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळत नसल्याबाबत तक्रार केली होती. त्यामुळे या शिष्टमंडळाने महाविद्यालयाच्या प्राचार्याची भेट घेतली व त्यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी प्रशासनाने मागील वर्षी प्रस्ताव न पाठवता यावर्षी पाठवले व त्यातून शिष्यवृत्ती मिळण्यास विलंब होत असल्याची माहिती दिली. महाविद्यालयाकडूनच विलंब झाला असल्याचे त्यांनी मान्य केले.
ही चूक प्रशासनाची व त्याचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या पैशांची गरज असते. सतत चौकशी करूनही त्यांना प्रशासनाकडून व्यवस्थित उत्तरे दिली जात नाहीत. महाविद्यालयाने आता आपल्या कामकाजात सुधारणा करावी, विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रस्ताव वेळेवर पाठवावेत, अन्यथा छात्रभारती आंदोलन करेल असा इशारा शिष्टमंडळाने प्राचार्याना दिला.