कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. या प्रश्नी आता नागपूरला विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मोरवाडी २५ गावे योजनेतून या गावाला पाणीपुरवठा होतो, मात्र वीजदेयक थकल्याने ही योजना सहा महिन्यांपासून बंद आहे. योजना सुरू करण्यासाठी यापूर्वी स्थानिक पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करूनही हा प्रश्न मार्गी लागला नाही. आता हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी उपोषण करण्याचे स्थानिक पत्रकारांनी ठरविले आहे.
आखाडा बाळापूर हे कळमनुरी तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून, गावाला मोरवाडी २५ गावे संयुक्त योजनेतून पाणी मिळते. मात्र, योजना हस्तांतराचा वाद व योजना केवळ टंचाईच्या काळातच चालते. पावसाळय़ात अनेक गावांना योजनेतून पाण्याची आवश्यकता नसल्याने व आखाडा बाळापूरला योजनेतील पाण्याशिवाय पर्याय नसल्याने टंचाईच्या काळातील वीजदेयकाची रक्कम भरण्यास कोणतेही गाव पुढाकार घेत नाही. परिणामी, थकीत वीजदेयकामुळे योजनेची वीज खंडित करण्यात आली आहे.