पुणे-बेंगलोर महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी शेतक ऱ्यांना व स्थानिकांना न जुमानता मुजोरपणे करत असल्याने सहापदरीकरणाचे काम रोखण्याचा इशारा आमदार मकरंद पाटील यांनी दिला आहे.
सहापदरी करणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. वीर धरणापासून विरमोडे (ता. वाई) येथपर्यंत काम करणारी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी स्थानिक शेतकऱ्यांना जुमानत नाही. मुजोरपणे काम करत आहे.
खंडाळा व वाई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी समजून घेण्यासाठी खंडाळा विश्रामगृहावर बैठक झाली. या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे राज्याचे मुख्य व्यवस्थापक डी. ओ. तावडे, प्रकल्प संचालक राजेश कौडल, (पुणे), तांत्रिक व्यवस्थापक प्रफुल्ल दिवाण, रिलायन्सचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक नागेंद्र रॉय, प्रकल्प व्यवस्थापक पांडे यांच्यासह बकाजीराव पाटील, नितीन भरगुडे पाटील, दत्ता नाना ढमाळ, अॅड. श्यामराव गाढवे, सत्यजित वीर, शशिकांत पवार, प्रतापराव पवार, विठ्ठल शिंदे, अजित शेवाळे आदी शेतकरी व स्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
खंडाळा तालुक्यातील वाढते औद्योगिकीकरण व स्थानिकांचे प्रश्न विचारात घेऊन महामार्गाच्या सहापदरी करणाच्या आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना आ.पाटील यांनी रिलायन्स व महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
खंबाटकी बोगद्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सहापदरी करणाचे काम करताना सुरुवातीला स्थानिकांच्या सहकार्याची अपेक्षा करता, नंतर त्यांना न विचारता काम करता हे बरोबर नाही. त्यांच्या तक्रारीची दखल घ्या. कवठे (ता. वाई) येथील किसन वीरांचा पुतळा स्थलांतरित करावा. वेळे, सुरूर कवठे, बोपेगाव, जोशी विहीर, भुईज पाचवड येथे काम करताना ओढे बुजविल्याने पाण्याचे प्रवाह वळले आहेत, ते मोकळे करण्यात यावेत. उसाचे ट्रक जातील असे बायपास करण्यात यावेत, आदी सूचना, स्थानिकांचे म्हणणे ऐकून आ. पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या.