अक्कलकोट रोड एमआयडीसीतील तब्बल ७७२ कारखानदारांशी निगडित असलेला सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) तीन कोटींच्या थकबाकीमुळे महापालिका प्रशासनाने बंद करताच अखेर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी यशस्वी शिष्टाई केली. त्यामुळे थकीत रक्कम भरण्याचे मान्य झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्ववत सुरू करण्यात आला.
थकीत तीन कोटींच्या रकमेपकी निम्मी रक्कम ३१ डिसेंबपर्यंत तर उर्वरित दीड कोटीची रक्कम ३१ मार्च २०१४पर्यंत जमा करण्याचे संबंधित कारखानदारांनी मान्य केले. त्यामुळे यशस्वी तोडगा निघून सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद न ठेवता तो पूर्ववत सुरू करण्यात आला.
अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे केंद्र शासनाच्या योजनेतून महापालिकेने सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च स्थानिक कारखानदारांनी करण्याचे ठरले होते. परंतु तीन कोटींचा खर्च होऊनही त्याची रक्कम कारखानदारांनी भरली नाही. शिवाय महापालिकेच्या विरोधात एलबीटी प्रश्नावर याच कारखानदारांनी आंदोलनात सहभाग घेतला.
तसेच एलबीटीसह मिळकत करही भरला नाही. त्यामुळे पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी एमआयडीसीतील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पच बंद करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार प्रकल्प बंद होताच स्थानिक कारखानदारांची कोंडी झाली.
दरम्यान, या कारखानदारांच्या शिष्टमंडळाने आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे मदतीची याचना केली. त्यानुसार आमदार शिंदे यांनी पालिका प्रशासनाबरोबर कारखानदारांची बठक घेऊन यशस्वी शिष्टाई केली. आयुक्त गुडेवार यांनीही हा तोडगा स्वीकारून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ववत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कारखानदारांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.