अहिल्यादेवी होळकर यांचे सार्वजनिक क्षेत्रातील कार्य सर्वाना प्रेरणा देणारे आहे. दूरदृष्टी ठेवून धार्मिक ठिकाणांच्या जवळपास तयार केलेले पाण्याचे बारव आजही अनेकांचे जीवन समृद्ध करीत आहेत. सर्वानी त्यांचे कार्य  व विचारांपासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन भारतीय जल संस्कृती मंडळाचे शाखा अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शहरातील पेठे विद्यालयात भारतीय जल संस्कृती मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. नाशिक शहरातील पूररेषेसंदर्भात २३ जून रोजी मंडळाच्या वतीने होणाऱ्या कार्यशाळेची माहिती त्यांनी या प्रसंगी दिली. या वेळी शशांक मदाने, राजेंद्र निकम, सरोजिनी तारापूरकर, रा. गो. हिरे, रत्नप्रभा सूर्यवंशी, कल्पना नागपुरे, दत्ता नागपुरे, रंजना परदेशी उपस्थित होते. सूत्रसंचालन मंडळाचे सचिव दिलीप अहिरे यांनी केले.
नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. काँग्रेस भवन येथे झालेल्या कार्यक्रमात शहराध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड यांच्या हस्ते अहिल्याबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी छाजेड यांच्यासह अशोक गोसावी, काँग्रेस शहर महिला अध्यक्षा वत्सला खैरे यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ कार्यकर्ते बापू शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी नगरसेविका योगिता आहेर, समिना मेमन, नगरसेवक राहुल दिवे, गटनेते लक्ष्मण जायभावे, माजी नगरसेविका उषाताई बेंडकोळी आदी उपस्थित होते.