ठाणे शहरातील पाणीगळती व चोरी रोखण्यासाठी तसेच ठाणेकरांना पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन व्हावे, यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने नव्या वर्षांत शहरामध्ये जलमापके बसविण्याचा संकल्प केला आहे. या संबंधी महापालिका प्रशासनाने प्रस्तावही तयार केला असून हा प्रस्ताव लवकरच सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी आणण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
ठाणे शहर, वागळे, घोडबंदर आणि कळवा-मुंब्रा या भागामध्ये पाणीचोरी तसेच गळतीचे प्रमाण सुमारे २० ते २५ टक्के असून त्याचा थेट फटका या भागातील पाणीवितरण व्यवस्थेच्या नियोजनास बसतो. महापालिका प्रशासनाकडून पाण्याकरिता ठरावीक पैसे आकारण्यात येतात. मात्र, पाणी वापरासंबंधी नागरिकांवर कोणतीही बंधने नाहीत. त्यामुळे शहरामध्ये वाहने धुण्यासाठी तसेच इतर कामांसाठी पाण्याची मोठय़ा प्रमाणात नासाडी केली जाते, असे महापालिका प्रशासनाच्या निर्दशनास आले आहे. त्यामुळे शहरातील पाणीगळती, चोरी तसेच पाण्याची नासाडी रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने नव्या वर्षांत शहरामध्ये जलमापक पद्धत लागू करण्याचा संकल्प आखला आहे. यंदाच्या अर्थिक वर्षांत ठाणे शहरात ४० टक्के जलमापन यंत्रणा कार्यन्वित करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील २५ मि.मी. व त्यावरील घरगुती जोडण्या तसेच नौपाडा, उथळसर, कोपरी या भागातील १५ मि.मी. व त्यावरील सर्व जोडण्यांना जलमापके बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी या अर्थिक वर्षांत सुमारे तीन कोटी ५० लाखांची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरामध्ये जलमापके बसविण्याचा प्रस्ताव तयार केला असून या प्रस्तावनुसार, शहरामध्ये टप्प्या टप्प्याने जलमापके बसविण्यात येणार आहेत. सुरुवातीला शहरातील गृहसंकुले आणि व्यावसियक वापराच्या ठिकाणी, त्यानंतर झोपडपट्टी भागांमध्ये जलमापके बसविण्याची योजना प्रशासनाने आखली आहे. तसेच घोडबंदर आणि कळवा-मुंब्रा भागातील पाणीपुरवठय़ामध्ये कशा प्रकारे वाढ करता येऊ शकते, याचा विचार महापालिका प्रशासनाने केला आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.