निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी नक्की किती पाणी सोडण्यात येणार याबद्दल जलसंपदा विभागाकडून निश्चितपणे काही सांगितले जात नसल्याने संभ्रमावस्था आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रवराकाठच्या गावांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे.
भंडारदरा निळवंडे धरणातून जायकवाडी कालपासून पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी आज सकाळी अकोल्यात पोहोचले. तीव्र उन्हामुळे पाण्याची वाटचाल मंदगतीने सुरू आहे. दरम्यान, भंडारदरा धरणाची पाणीपातळी कमी झाल्यामुळे आज दुपारी १ वाजता जलविद्युतनिर्मिती केंद्र बंद पडले. आता भंडारदरा धरणाच्या मो-यामधून पाणी सोडण्यात येत आहे, मात्र पाणीपातळी जसजशी कमी होईल तसतसे धरणातून बाहेर पडणा-या पाण्याचे प्रमाण कमी होत जाईल. आज सायंकाळी भंडारदरा धरणातील पाणीसाठा २ हजार ३४७ दलघफू होता. धरणातून पाण्याचा १ हजार ३६० क्युसेक्सचा विसर्ग सुरू होता. निळवंडे धरणातील पाणीसाठा सायंकाळी ६७५ दशलक्ष घनफूट होता. धरणातून १ हजार ७५० क्युसेक्सने पाणी बाहेर पडत होते.
निळवंडेतून जायकवाडीसाठी पाणी सोडले तेव्हा निळवंडे भंडारदरा धरणात तीन टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा होता. त्यातील एक टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात येणार असल्याचे बोलले जात होते, मात्र किती पाणी सोडणार याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत आदेश नसल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे. नक्की किती पाणी सोडले जाते हे निश्चित नसल्यामुळे प्रवरेकाठच्या गावांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. भंडारदरा-निळवंडेतील उपलब्ध पाणीसाठय़ानुसार जुलैअखेरपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार पिण्याच्या पाण्याची तीन आवर्तने श्रीरामपूरपर्यंत आणि दोन लघुआवर्तने अकोले-संगमनेपर्यंत सोडण्यात येणार होती. मात्र आता हे नियोजन पूर्णपणे कोलमडणार आहे. अपेक्षेपेक्षा अधिक पाणी सोडले गेल्यास अकोले शहरासह अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.