पहाडी प्रदेशावर विस्तीर्ण पसरलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागल्याने वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती सुरू असताना वन विभाग, स्वयंसेवी संस्था आणि वन्यजीवप्रेमींनी दूरदूरवर असलेल्या पाणवठय़ांमध्ये पाणी भरण्यासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. अमरावतीच्या निसर्ग संरक्षण संस्थेचे स्वयंसेवक आणि वन खात्याचे कर्मचारी कोरडे पाणवठे रोज तपासून टँकरने तसेच हापशीने पाणी भरत असल्याने पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. काही कृत्रिम पाणवठे सौर यंत्राद्वारे पाणी उपसून तर काही पाणवठे हापशीने पाणी खेचून काठोकाठ भरले जात आहेत.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे प्रकल्प संचालक कौशलेश सिंग यांनी जंगलातील पाणवठय़ांवर देखरेख करण्याचे सक्त निर्देश दिले असून त्यानुसार युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी ग्राम विकास समिती आणि स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली जात आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना मेळघाटला देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले होते. मेळघाटचे जंगलक्षेत्र २०२९.०४ चौरस किलोमीटरचे असून एवढय़ा मोठय़ा जंगलात एकही प्राणी तहानलेला राहू नये, यासाठी युद्धपातळीवर पुरवठय़ाचे काम हाती घेण्यात आले असून प्रत्यक भागाला पाणी पुरवणे अत्यंत अवघड आहे, तरीही वन कर्मचारी एक एक पाणवठा भरलेला राहील, याची काळजी घेत असल्याचे कौशलेश सिंग यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
सातपुडा पर्वतरांगामध्ये खोल दऱ्याखोऱ्यात वसलेले हे पहाडी प्रदेशातील जंगल शुष्कपर्णी असून उन्हाळ्यात झाडांची पाने गळून गेल्याने पाणीटंचाई अधिकच भीषण झाली आहे. तापमान प्रचंड वाढले आहे. मध्य भारतातील अत्यंत जुन्या आणि जैववैविध्याने नटलेल्या मेळघाटच्या जंगलात वाघ, अस्वल, बिबट, गवे, चितळ, चौशिंगा, रानडुकरे, लंगूर, हनुमान लंगूर, जंगली कुत्रे, सरपटणारे विविध प्रकारचे प्राणी, मोर, लांडोरसह विविध पक्षीप्रजाती वास्तव्यास आहेत. मेळघाटात पावसाचे प्रमाण अन्य प्रदेशांपेक्षा जास्त असले तरी यंदाच्या उन्हाळ्यातील परिस्थिती आधीच्या दिवसांपेक्षा बिकट असल्याचे सातपुडा फाऊंडेशनचे संस्थापक किशोर रिठे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
मेळघाटच्या उंच आणि सपाट अशा संमिश्र जंगलात पाणवठे निर्माण करून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय करून देणे सोपे नाही. तसेच वन खात्याचे कर्मचारी संपूर्ण जंगलक्षेत्रात गस्त घालत असूनही जंगल पूर्णपणे फिरणेदेखील शक्य नाही. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पाणवठे भरण्याचे काम सुरू आहे. अमरावतीला रविवारी ४७.३ अंश सेल्सियस एवढे उन्हं तापले होते. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखळल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यालाही यंदा उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. वाढत्या उन्हामुळे पहिल्या पावसाची वाट पाहणारे वन्यजीव सैरभैर झाले असून पाण्यासाठी त्यांची भटकंती सुरू आहे. मेळघाटच्या जंगलाला पाणी पुरवठा करणारी सिपना नदी जागोजागी आटली आहे. नदीच्या खडकाळ पात्रातील पाणी अडविण्याच्या जागा हेरून पाण्याची सोय करण्यासाठी निसर्ग संरक्षण संस्थेचे स्वयंसेवक जीवाचा आटापिटा करत आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातून दूरदूपर्यंत पाण्याचा थेंब दृष्टिपथात पडत नाही. मैलोंगणती पायपीट करून वन्यजीव पाण्याच्या शोधात पाणवठय़ावर येत आहेत. काही कृत्रिम पाणवठे बंधारे बांधून तयार करण्यात आले आहेत. पाण्याची बशी तयार करताना प्लास्टिकचा आधार देण्यात आला असल्याने पाणी साठून राहते, तसेच आजूबाजूला दगडांची पाथ तयार करण्यात आल्याने संपूर्ण नैसर्गिक वाटतील, असे हे पाणवठे म्हणजे खरोखरीच आश्चर्य आहेत. मेळघाटातील वन्यजीवांसाठी जलदूत बनून आलेले निसर्ग संरक्षण संस्थेचे बोरी-कोठा येथील मुठवा कम्युनिटी सेंटरचे काम पाहणारे प्रो. निशिकांत काळे, नेहरू येवले,  राहुल काळमेघ, गजानन शनवारे, अशोक आठवले, भुरा कसदेकर यांच्यासह तळागाळातील असंख्य स्वयंसेवक दुर्गम जंगलात फिरून पाणवठय़ांच्या देखरेखीचे काम करीत आहेत. जंगल वाचविण्यासाठी आदिवासींचे समुपदेशन करण्याचे प्रमुख काम करतानाच ‘पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा’, असा संदेश देत गावोगावी फिरत आहेत. कडक उन्हाची पर्वा न करताना शुष्क जंगलात चकरा मारून पाण्याचे टँकर पाणवठय़ांपर्यंत पोहोचविण्यासाठी जीवाचे रान करून हे स्वयंसेवक काम करत आहेत. त्यासाठी तहानभुकेचीसुद्धा त्यांना पर्वा राहत नाही. या जलदूतांमुळेच मेळघाटातील वन्यजीवांचे जीवन किंचित सुखकर झाले आहे.