डिसेंबरमध्येच पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये जलस्रोत आटल्याने पाणी मिळेनासे झाले आहे. दुष्काळाची छाया अधिक गडद होत असल्यामुळे अनेक कुटुंबांनी चक्क स्थलांतर सुरू केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पालिका क्षेत्रात स्थिती काहीशी समाधानकारक असली, तरी उस्मानाबाद शहरात मात्र पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे.
यंदा पावसाळ्यात सरासरीच्या निम्मा ३९७ मिलीमीटर पाऊस झाला. परिणामी एकही धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. गतवर्षी केवळ ५२० मिलीमीटर पावसाची नोंद होती. या वर्षी सर्वच प्रकल्पांत ठणठणाट आहे. कमी पावसामुळे भूजल पातळीतही वाढ होऊ शकली नाही. जिल्ह्यात ३ मोठे, १७ मध्यम व १९२ लघुप्रकल्प आहेत. तिन्ही मोठय़ा प्रकल्पांत उपयुक्त साठा शिल्लक नाही, तर १७ मध्यम प्रकल्पांत केवळ ०.२४० दशलक्ष घनमीटर व लघुप्रकल्पात ५.९७८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.
उस्मानाबाद शहराला तेरणा व रूईभर या दोन प्रकल्पांतून पाणीपुरवठा होतो. रूईभर पूर्णत: आटले. तेरणा धरण ४० टक्क्य़ांपेक्षा अधिक गाळाने भरले आहे. त्यामुळे येथे पुरेसा साठा होऊ शकत नाही. धरणात खोदलेल्या काही विहिरींचा परिसरातील येडशी, ढोकी, तडवळा या गावांना दिलासा आहे. उस्मानाबाद शहराला २० दिवसांतून एकदा पाणीपुरवठा सुरू आहे. टंचाईवर मात करण्यासाठी अंबेहोळ, बेडकीनाला येथील साठवण तलावातून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. बेडकीनाला येथील पाणीसाठा संपुष्टात आला, तर अंबेहोळ येथील स्थानिकांनी पाणी देण्यास विरोध केल्यामुळे आता चोराखळी येथून ३३ टँकरद्वारे पाणी आणले जात आहे. तेथे जानेवारीपर्यंत पुरेल एवढा साठा आहे. त्यानंतर बार्शी तालुक्यातील ढाळे िपपळगाव अथवा िहगणी येथील प्रकल्पातून पाणी आणण्याचा पर्याय प्रस्तावित आहे. या शिवाय शहराला उजनी धरणातून पाणीपुरवठा करण्याच्या योजनेचे काम जानेवारीअखेपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले. हे काम पूर्ण झाल्यास टँकरची गरज भासणार नसल्याचे प्रशासन सांगते. शहराच्या टँकरवर आतापर्यंत ४ कोटी १ लाख ५७ हजार रुपये खर्च झाला.
तुळजापूर व नळदुर्ग शहरांना कुरनूर प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जात आहे. तुळजापूर तीर्थस्थळी स्थानिक लोकसंख्येबरोबरच येणाऱ्या भाविकांचा विचार करता फेब्रुवारीनंतर हरणी प्रकल्पातून टँकरद्वारे पाणी आणावे लागणार आहे. हरणी प्रकल्पात सध्या १.४ दशलक्ष घनमीटर साठा आहे. त्यानंतर बार्शी तालुक्यातील जवळगाव येथून पाणी आणणे प्रस्तावित आहे. या शहराला ४ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. नळदुर्ग व तुळजापूर या दोन्ही पालिकांना पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कुरनूर प्रकल्पातील पाणीसाठा संपल्यानंतर उमरगा तालुक्यातील बेनितुरा प्रकल्पातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर १५ िवधनविहिरी मंजूर केल्या आहेत. उमरगा शहराला तुरोरी व कोरेगाव प्रकल्पांमधून पाणीपुरवठा केला जातो. दोन्ही प्रकल्प कोरडे पडल्याने कोळसूर तलावातील पाणी आष्टा प्रकल्पात आणून पाणीपुरवठा सुरू आहे. तेथील पाणी संपल्यानंतर बेनितुरा प्रकल्पावर शहराची मदार असणार आहे. माकणी धरणातून पाणी पुरवठय़ाची योजना देखील पूर्णत्वाकडे येत असल्याने ती पूर्ण झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल, असे पालिका प्रशासन सांगते. परंडा शहरही भीषण पाणीटंचाईस सामोरे जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भोत्रा धरणातील पाणीसाठा संपला आहे. खासापुरी प्रकल्पाने मृत पातळी गाठली. त्यामुळे सीना-कोळेगाव प्रकल्पातून १० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या प्रकल्पात जून महिन्यापर्यंत पुरेल एवढा साठा शिल्लक आहे. टँकरची संख्या दुप्पट करण्याचा प्रस्ताव पालिकेने मांडला आहे. टँकरवर आतापर्यंत ३१ लाख १८ हजार रुपये खर्च झाला आहे. एरवी टंचाईपासून दूर असलेल्या कळंब, वाशी, भूम, मुरूम या मोठय़ा शहरांचाही पाणीप्रश्न गंभीर होत चालला आहे.
लोकप्रतिनिधींचा नियोजनशून्य कारभार
उस्मानाबाद नगरपालिकेचे प्रशासन पाणीप्रश्नी नेहमीच उदासीन राहिले. लोकप्रतिनिधींचा ढिसाळपणा व नियोजनशून्य कारभार लोकांच्या जणू अंगवळणी पडला आहे. पाण्याचे वेळापत्रक पालिकेकडून कधीच जाहीर केले जात नाही. लोकही विचारण्याची तसदी घेत नाहीत. पाणी वापराबाबतही लोकांमध्ये गांभीर्य दिसत नाही.