तीव्र पाणी टंचाईचा फटका येथील रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या गाडय़ांनाही बसला असून सुपरफास्ट मेल व एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळेतच फलाटावर पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय मनमाड रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पॅसेंजर व शटल या गाडय़ांच्या वेळात फलाटावर पाणी देण्यात येणार नाही. हा गोरगरीब प्रवाशांवर सरळ अन्याय असून पाणी प्रश्नावर रेल्वे प्रशासनाकडून भेदभाव होत असल्याची टीका केली जात आहे. रेल्वेसाठीच्या पादोद्याजवळील साठवणूक तलावातील पाणी संपत आल्याने प्रशासन हतबल झाले होते. त्यातच शहरातील पाणी टंचाईमुळे नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी स्थानकावर पाणी भरण्यासाठी येत आहेत. त्यामुळे रेल्वेलाही त्याविरुद्ध उपाययोजना सुरू करणे भाग पडले आहे. पालखेड धरणातून सोडण्यात आलेले पाणी साठवणूक तलावात आले आहे. परंतु गाडय़ा धुण्यासाठी पाण्याचे नियोजन कसे करावे, ही समस्या रेल्वे प्रशासनापुढे कायम आहे. स्थानकालगतच्या तीन विहिरी ताब्यात घेऊन त्या स्वच्छ करण्यात येत आहेत. त्यातील पाणी रेल्वे डबे धुण्यासाठी वापरले जाणार आहे. रेल्वे गाडय़ांच्या गर्दीच्या वेळातच फक्त फलाटांवरील पाणपोईच्या नळांना पाणी सोडले जाणार आहे. देशभरातून या स्थानकातून दररोज सुमारे ६० गाडय़ांतून ये-जा करणाऱ्या सुमारे २५ हजार प्रवाशांनाही टंचाईचा सामना करणे भाग आहे. सकाळी आठ ते नऊपर्यंत महानगरी एक्स्प्रेस गोवा, तपोवन, गोदावरी, झेलम या प्रमुख सुपरफास्ट गाडय़ांची ये-जा होत असल्याने या वेळात रेल्वे स्थानकातील सर्व फलाटांवर पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2013 रोजी प्रकाशित
मनमाड स्थानकात रेल्वे प्रवाशांना टंचाईचा फटका
तीव्र पाणी टंचाईचा फटका येथील रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या गाडय़ांनाही बसला असून सुपरफास्ट मेल व एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळेतच फलाटावर पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय मनमाड रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पॅसेंजर व शटल या गाडय़ांच्या वेळात फलाटावर पाणी देण्यात येणार नाही.
First published on: 15-03-2013 at 12:27 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water shortage in manmad railway station