दिवाळीच्या तोंडावरच अखेर कोपरगावकरांना गोदावरीच्या पाण्याने दिलासा दिला. नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरीच्या डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी आज आवर्तन सोडण्यात आले. मात्र, कोपरगावकरांना ते येत्या सोमवारी मिळेल.
माजी मंत्री शंकरराव कोल्हे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव बिपीन कोल्हे यांनी शहराला पिण्याच्या पाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. कोपरगाव नगरपालिकेस गोदावरी डाव्या कालव्यातून पाणी दिले जाते. मागील काळातील पाण्याचे आवर्तन ६० दिवसांवर गेल्याने नगरपालिकेचे तलाव कोरडे पडले. ऐन दिवाळीत पाणी मिळणार नसल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी उपजिल्हाधिकारी डॉ. अजय मोरे यांनी प्रत्यक्ष पहाणी करून दिला होता. दिवाळी पाण्याविना जाणार या कल्पनेनेच कोपरगावकर हवालदिल झाले होते.
कोल्हे पिता-पुत्रांनी जलसंपदामंत्री सुनील तटकरे, तसेच महसूल व पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठांना भेटून परिस्थितीचे गांभीर्य पटवून दिले. मात्र, त्यातही पाणीपट्टीच्या अडचणी होत्या. कोपरगाव पालिकेकडे पाणीपट्टीची मोठी थकबाकी आहे. पैकी ३ लाख ५० हजार रुपये भरल्यानंतर आज दुपारी १ वाजता नांदूर मध्यमेश्वर धरणातून १५० क्युसेक वेगाने गोदावरी डाव्या कालव्यात पाणी सोडण्यास प्रारंभ केला. हे पाणी नगरपालिकेच्या साठवण तलावात शनिवारी सायंकाळपर्यंत पोचणार आहेत. त्यानंतर सोमवारपासून कोपरगावकरांना नियमित पाणी पुरवठा केला जाईल. या सहकार्याबद्दल नगराध्यक्षा सुरेखा राक्षे, उपनगराध्यक्ष मीनल खांबेकर व मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांनी कोल्हे पितापुत्रांचे आभार मानले. तसेच नागरिकांना त्यांनी काटकसरीचे आवाहन केले आहे.