शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. त्यामुळे उद्यापासून (शुक्रवार) शहरात स्वच्छ पाणी मिळू शकेल, असा दावा महापालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर यांनी केला.
श्री श्री रविशंकर यांच्या आगमनानिमित्त महापालिकेने २१ नोव्हेंबर हा स्वच्छता दिन म्हणून पाळण्याचा निर्धार केला. त्या अनुषंगाने स्थायी समितीच्या सभेत तसा ठराव घेण्यात आला. ठरावाची प्रत महापौर प्रताप देशमुख यांनी रविशंकर यांना दिली.
स्वच्छता दिन साजरा झाल्याच्या पाश्र्वभूमीवर अष्टभुजा मंदिर, मुल्लामस्जिद या भागात स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता मोहिमेच्या प्रारंभी महापौर देशमुख, उपमहापौर सज्जुलाला, आयुक्त शंभरकर, विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे, सहायक आयुक्त मुजीब खान, माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग, प्रमोद वाकोडकर, राजेंद्र वडकर आदी उपस्थित होते.
जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता
शहराला जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी येते. दरवर्षी पाहणी करून जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता करण्यात येते. स्वच्छता मोहिमेत ३८ क र्मचारी कार्यरत आहेत. या मोहिमेमुळे शहराला स्वच्छ पाणीपुरवठा होईल, अशी माहिती शंभरकर यांनी दिली. शंभरकर यांनी स्वत: केंद्राची पाहणी करून उपस्थित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.