वडिलांच्या नावावर सुरू केलेला साखर कारखाना ज्यांना चालवता आला नाही, त्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विकासाला ब्रेक लागल्याचे सांगतात. ‘बीआरजीएफ व पीएमजीएसवाय’ योजनेतून ग्रामीण भागातून वैयक्तिक निधी गोळा करण्याचा गोरखधंदा सुरू केल्याचा आरोप करणाऱ्या सूर्यकांता पाटील यांना पुन्हा त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा टोला खासदार सुभाष वानखेडे यांनी पत्रकाद्वारे लगावला.
लोकसभेच्या निवडणुकीला अजून अवधी असताना हिंगोली मतदारसंघातील वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. कळमनुरीचे आमदार राजीव सातव यांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस हिंगोली जिल्हय़ात काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच पाटील यांनी राष्ट्रवादीतर्फे आपली उमेदवारी जाहीर करून टाकली. टीका करताना त्या म्हणाल्या, माझ्या काळातील मंजूर निधीतील १०० कोटी अजून वानखेडे यांना आणता आले नाहीत. बीआरजीएफ व पीएमजीएसवायअंतर्गत योजनेतून ग्रामीण भागात वैयक्तिक फंड गोळा करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
या आरोपाचा वानखेडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे समाचार घेतला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत गैरकारभार चालू असल्याच्या तक्रारी आल्याचे सांगून सूर्यकांता पाटील यांच्या वक्तव्याची त्यांनी हवा काढून घेतली. वडिलांच्या नावावरील कारखाना ज्यांना चालविता आला नाही, त्यांनी विकासकामांसाठी किती कोटी आणले हे सांगण्याची गरज नाही, असा टोला वानखेडे यांनी लगावला.