देशातील सर्वाधिक विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राचा विकास करणार असून उद्योजकांना सुलभ सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने एक खिडकी योजना अधिक गतिमान करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील सीएट टायर्स प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, सीएट टायर्सचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका, आमदार समीर मेघे, समीर कुणावार, आशिष देशमुख, सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव अपूर्व चंद्र प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उद्योजकांचा विश्वास पुनस्र्थापित करणे हे शासनापुढे आव्हान होते. आपले वैभव पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी शासनाने उद्योजकांशी मैत्रिपूर्ण धोरण ठरविले आहे. यातून करक्षमता वाढणार आहे. शिवाय रोजगार वाढल्यामुळे क्रयशक्तीही वाढणार आहे. अशा धोरणामुळे उद्योगाबरोबरच इतर विभागालाही चालना मिळणार आहे.
सीएट टायर्सला एकाच दिवसात परवानगी देणे हे देशाच्या इतिहासातील पहिला अनुभव असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकल्पासाठी एकाच महिन्यात जमीन उपलब्ध करून दिली आणि अन्य कायदेशीर बाबींची पूर्तता करून आज भूमिपूजन समारंभ होत आहे. नवीन सरकार असेच चांगले काम यापुढेही करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सर्वसाधारणपणे उद्योग सुरू करण्यासाठी विविध प्रकारचे ७६ दाखले घ्यावे लागतात. ही संख्या कमी करून आता फक्त २० ते २५ प्रमाणपत्रे घ्यावे लागतील. उद्योजकांशी मैत्रिपूर्ण धोरणात आता परवाने देण्यासाठी एक खिडकी पद्धत लागू करणार आहोत. अर्ज केल्यापासून ठराविक दिवसात नादेय प्रमाणपत्र देणे आता कार्यालयाला बंधनकारक राहणार आहे. उद्योगाच्या संदर्भातील पारदर्शक धोरण ठेवून मिहानमध्ये वीज देण्यात येईल. उद्योजकांना चालणा देणाऱ्या धोरणामुळे राज्यात मोठय़ा प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शासनात गतिमानता आली असून ती पुढेही कायम ठेवणार असल्याचे सांगितले. सीएट टायर्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक अनंत गोयंका यांनी प्रकल्पाची माहिती दिली. या प्रकल्पास सुविधा पुरविल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.