‘‘माजी आमदार माधवराव पवार यांनी माझ्या मुलाला मुलगी दिली म्हणजे आम्ही त्यांचे जीवन लिहून घेतले नाही. सुनेला मी मुलगी म्हणून स्वीकारले. त्यांना राजकारण करण्याचा अधिकार आहे. पक्षांतर करून त्यांनी राजकारणासाठी आमच्यावर आरोप करीत कौटुंबिक नाते तोडले असले, तरी आम्ही तसे वागणार नाही. त्यांच्याविषयी बोलू नका म्हणून मी तिन्ही मुलांना बजावले आहे. पवार भाजपात गेले नसते, अपक्ष राहिले असते तर आमदार झाले असते. लोकसभेची उमेदवारी कोणालाही मिळो, आम्ही राष्ट्रवादीचा प्रामाणिकपणे प्रचार करणार आहोत,’’ असे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी स्पष्ट केले. जिल्ह्य़ातील प्रसारमाध्यमातून ‘सर्व काही गोपीनाथ मुंडेच’ असे सुरू असलेले चित्र बरोबर नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
बीड जिल्ह्य़ाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांचे व्याही माधवराव पवार यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. गेवराईत १७ मे रोजी खासदार मुंडे यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा घेऊन माधवराव पवार व अॅड. लक्ष्मणराव पवार यांनी कौटुंबिक नातेवाईक असलेल्या राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव पंडित व त्यांचे चिरंजीव आमदार अमरसिंह पंडित यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे गेवराईच्या राजकारणात पुन्हा एकदा कौटुंबिक नात्यातील नेत्यांचा संघर्ष उफाळला आहे.
या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना शिवाजीराव पंडित यांनी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली. माधवरावांनी भाजपमध्ये प्रवेश करताना केलेल्या आरोपात तारतम्य ठेवणे आवश्यक होते. अॅड. लक्ष्मण पवार यांनी बहिणीशी नाते तोडल्याचे सांगितले असले, तरी आपण सुनेला मुलगी म्हणून स्वीकारले असल्याने ती त्यांच्या दारात कशाला जाईल? पवारांनी कितीही आरोप केले, तरी त्यांच्याबद्दल काही बोलू नका, असे मी अमरसिंह, जयसिंह व विजयसिंह यांना बजावले आहे. विजयसिंहचा स्वभाव तापट असला, तरी त्याला समजावले आहे. पवारांनी भाजपमध्ये न जाता अपक्ष राहिले असते तर त्यांचा मुलगा आमदार होऊ शकला असता. आमच्यावर आरोप केल्याशिवाय जनता त्यांच्यावर विश्वास कशी ठेवणार? त्यामुळे आम्ही त्यांच्या आरोपावर योग्य वेळी बोलू.
निवडणुकांना आणखी वर्ष बाकी आहे. खासदार मुंडेंनी कितीही जंग पछाडले, तरी अमरसिंह उमेदवार असल्यास गेवराईतून राष्ट्रवादीलाच आघाडी मिळेल. लोकसभेची उमेदवारी पक्षाचा विषय आहे. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागरही उमेदवार झाले, तर आम्ही त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करू. आमच्या पोटात व ओठात एकच असते. साथ व विरोध सांगून करतो. भाजपमध्ये असताना लोकसभा निवडणुकीत खासदार मुंडेंसाठी प्रकृती ठीक नसताना आपण प्रामाणिक काम केले. मात्र, विधानसभा निवडणुकीत गेवराई मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर अमरसिंह पंडित उभे असताना राजभाऊ मुंडेंनी विरोध का केला? अरुण इंगळे उमेदवार कसे झाले? याची उत्तरे मुंडे देणार का? पण लोकांना सर्व काही माहीत आहे.
वरून एक, आतून एक हीच जादूची कांडी का? त्यामुळे खासदार मुंडे यांची राजकीय विश्वासार्हता राहिली नाही. मुंडे राज्यात काय करतील माहीत नाही. पण जिल्ह्य़ात त्यांना साथ मिळणार नाही. ५० वर्षांच्या राजकीय आयुष्यात गेवराई मतदारसंघावर शिवाजीराव पंडित यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. राजकीय महत्त्वाकांक्षेतून पहिल्यांदा पुतणे बदामराव पंडित यांनी बंड करून आव्हान दिले, त्यानंतर आता व्याही माधवराव पवार यांनी राजकीय संघर्ष उभा केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2013 रोजी प्रकाशित
माधवराव पवारांप्रमाणे आम्ही वागणार नाही!
‘‘माजी आमदार माधवराव पवार यांनी माझ्या मुलाला मुलगी दिली म्हणजे आम्ही त्यांचे जीवन लिहून घेतले नाही. सुनेला मी मुलगी म्हणून स्वीकारले. त्यांना राजकारण करण्याचा अधिकार आहे.
First published on: 21-05-2013 at 01:57 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will not behave as madhavrao pawar behaves shivajirao pandit