जैन समाजाला केंद्र सरकारने अल्पसंख्याकाचा दर्जा दिल्याच्या निर्णयाचे शहरातील जैन समाजाने जोरदार स्वागत केले. शहरातील विविध जैन संघटनांनी पेढे वाटून हा आनंद व्यक्त केला.
ओसवाल पंचायत सभा, डाळ मंडई, जय आनंद ग्रुप, बडी साजन युवा संघ, जैन सोशल फोरम, व्यापारी असोसिएशन आदी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले. ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष संजय चोपडा व प्रधानमंत्री संपत बाफना यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे, की तब्बल १८ वर्षांनंतर समाजाची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या विविध विकास योजनांचा समाजाच्या उन्नतीसाठी लाभ होणार आहे. त्याचा फायदा पूर्ण समाजाला होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
जैन युवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे या निर्णयाबद्दल आभार मानले आहेत. विलंबाने का होईना केंद्र सरकारने समाजाच्या भावनांचा आदर करून ही मागणी मान्य केली. समाजातील सर्व जाती-पोटजातींना या निर्णयाचा मोठा फायदा होईल असा विश्वास अभिजित लुणिया यांनी व्यक्त केला. अभय कटारिया, महेश भळगट, राजेंद्र बलदोटा, संतोष बोरा आदी या वेळी उपस्थित होते.