रेल्वेमंत्रीपदावर सुरेश प्रभू यांची निवड होताच आता तरी उपनगरी रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबई आणि लगतच्या परिसरातील ८० लाख प्रवाशांना न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. लोकलमधील महिला प्रवाशांची सुरक्षा, प्रलंबित असलेल्या नव्या गाडय़ा ताफ्यात दाखल करणे या प्रश्नांवर तातडीने निर्णय व्हावा अशी अपेक्षा प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.

कल्याण-मुंबई पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी निधी हवा
या मार्गिकेचे ठाणे ते कुर्ला आणि कल्याण ते दिवा हे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. मात्र ठाणे-दिवा आणि कुर्ला-सीएसटी या दोन टप्प्यांचे काम अद्यापही रखडलेले आहे. कुर्ला-सीएसटी या प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च ९०० कोटी रुपये एवढा आहे. या कामासाठी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात अत्यंत तुटपुंजी तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होऊन उपनगरीय गाडय़ांसाठी चार मार्गिका वापरता येतील. त्यामुळे प्रभू यांनी निधीचा प्रश्न सोडवण्याची मागणी आहे.

नव्या गाडय़ा हव्यात!
मध्य रेल्वेवर हार्बर तसेच मुख्य मार्गावरील अनेक गाडय़ा जुन्या आहेत व त्यांचे आयुर्मान कधीच संपले आहे. मात्र तरीही या गाडय़ा धावत आहेत. या गाडय़ांमध्ये बिघाडाच्या घटनाही वारंवार घडत असतात. सध्या बंबार्डिअर कंपनीच्या नव्या गाडय़ा ताफ्यात दाखल होण्याच्या मार्गावर आहेत. या कंपनीच्या ७२ गाडय़ा मुंबई उपनगरीय सेवेसाठी येणार असून त्यांची विभागणी पश्चिम आणि मध्य रेल्वेमार्गावर होणार आहे. पण सध्या या दोन्ही मार्गावर १५ डब्यांच्या गाडय़ा जास्तीत जास्त धावण्याची गरज आहे. त्यासाठी जादा डब्यांची आवश्यकता आहे.

परळ टर्मिनस
मध्य रेल्वेच्या कुर्ला-सीएसटी पाचवी-सहावी मार्गिका या प्रकल्पाचाच एक भाग असलेल्या परळ टर्मिनसचा प्रश्न गेली दोन ते तीन वर्षे रेल्वे मंत्रालयात पडून आहे. केवळ ८० कोटी रुपयांचा खर्च असलेल्या या प्रकल्पामुळे मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील गर्दीला चांगलाच दिलासा मिळेल. या टर्मिनसमुळे उपनगरीय सेवा दादरसह परळ स्थानकातूनही सोडता येतील किंवा खंडित करता येतील.

कल्याण-वाशी मार्ग
कल्याण-वाशी रेल्वेमार्गासाठी कळवा ते ऐरोली या दरम्यान उन्नत रेल्वेमार्ग बांधण्याची गरज आहे. त्यासाठी काही परवानग्या आवश्यक असून नव्या रेल्वेमंत्र्यांकडून या प्रकल्पाबाबत ठोस निर्णय व्हावा, अशी हजारो प्रवाशांची मागणी आहे. या प्रकल्पामुळे ठाणे स्थानकावरील निम्म्यापेक्षा जास्त भार कमी होईल.

जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा
उपनगरीय रेल्वेवर लवकरात लवकर नवीन गाडय़ा यायला हव्यात. नव्या रेल्वेमंत्र्यांनी उपनगरीय रेल्वेसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यायला हवा.
सुभाष गुप्ता, अध्यक्ष (यात्री संघ, मुंबई)

प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत
ठाणे-बोरिवली रेल्वेमार्ग, बंबार्डिअर गाडय़ा असे अनेक प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. रेल्वेची कोणतीही योजना सर्वप्रथम पश्चिम रेल्वेवर आणली जाते. हा मध्य रेल्वेच्या प्रवाशांवर अन्याय आहे. तोदेखील दूर झाला पाहिजे.
नंदकुमार देशमुख, अध्यक्ष (उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघ)

महिला सुरक्षेला प्राधान्य द्यावे
नव्या रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे धोरण आखताना महिला सुरक्षेचा विचार करायला हवा. त्यासाठी ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. मुंबईसारख्या शहरात सर्वात जास्त महिला रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे त्यांचा विचार करून जादा महिला विशेष गाडय़ा, लोकल गाडय़ांमध्ये महिला डब्यांची जादा संख्या असे उपाय करायला हवेत. तसेच सर्व गाडय़ा १५ डब्यांच्या करण्यावरही भर द्यायला हवा.
लता अरगडे, महिला प्रतिनिधी (उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघ)

खासदारांचे सांगणे..
मीरा-भाईंदर व नवी मुंबईसाठी विशेष प्रयत्न
सीवूड हे जागतिक दर्जाचे स्थानक बनवले जात आहे. त्याचपाठोपाठ ठाणे स्थानकाचा विकास होणे गरजेचे आहे. ठाण्याचे विस्तारित स्थानक उभारणेही आवश्यक आहे. नवी मुंबईत आणखी दहा नवीन स्थानके बांधण्याबाबतही आम्ही प्रस्ताव सादर केला आहे. तसेच मीरा-भाईंदर या स्थानकांचा विकास व्हावा, या स्थानकांबरोबरच स्थानक परिसरातही रेल्वे, रिक्षा, सार्वजनिक बस वाहतूक सुविधा यांचे एकत्रीकरण व्हावे.
राजन विचारे, ठाणे

चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्ग हवाच
पश्चिम उपनगरांतील प्रवाशांच्या समस्यांचा विचार केला, तर सध्याच्या चार मार्गिकांशिवाय आणखी मार्गिका असणे आवश्यक आहे. त्यासाठी चर्चगेट-विरार उन्नत मार्गाचा विचार गांभीर्याने केला पाहिजे. तसेच कांदिवली, बोरिवली, भाईंदर या तीन स्थानकांच्या विकास आराखडय़ाबाबतही नव्या रेल्वेमंत्र्यांकडून निधीची तरतूद करून घेतली जाईल.     
गोपाळ शेट्टी, उत्तर मुंबई.

मध्य रेल्वे रुळावर आणणार
गेल्या दोन महिन्यांत मध्य रेल्वेवर होणाऱ्या ‘डिरेलमेण्ट’च्या घटनांबद्दल मी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी बोललो आहे. आता लवकरच रेल्वे मंत्रालयातील उच्च अधिकारी मध्य रेल्वेमध्ये येणार असून येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करतील.    
किरीट सोमय्या, ईशान्य मुंबई.

अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न
मध्य आणि कोकण रेल्वेमार्गावर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. रेल्वेरुळांना वारंवार तडे कसे जातात, रुळ बनवताना त्यात काही तांत्रिक दोष आहेत का, रुळांचे परीक्षण कोण करते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत. ती उत्तरे येत्या काळात शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. अरविंद सावंत, दक्षिण मुंबई.