स्पीड चांगला आहे..सुरुवातीची प्रोसेस थोडी वेळखाऊ आहे. ट्रेनमध्ये चढल्यावर मात्र ‘तो’ मिळत नाही इथपासून ‘वायफाय’ म्हणजे काय रे भाऊ, अशा स्वरूपाच्या चर्चाना मंगळवारी कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात अक्षरश: उधाण आले होते. या दोन्ही स्थानकांमध्ये मोफत वायफाय सेवेची सकाळी सुरुवात झाली आणि येथून प्रवास करणाऱ्यांमध्ये आपापल्या मोबाइलमध्ये कनेक्टिव्हिटी मिळविण्यासाठी लगबग पाहायला मिळाली. इंटरनेटचा वेग चांगला असल्याची प्रतिक्रिया एकीकडे व्यक्त होत असताना सुरुवातीचे नोंदणीची वेळखाऊ प्रक्रिया तरुणांना जाचक वाटत होती. कळव्यापाठोपाठ ठाण्यात ही सेवा कधी सुरू होणार, अशी विचारणाही येथे होताना दिसत होती.
कळवा आणि मुंब्रा ही दोन्ही स्थानके ठाण्याच्या जवळ असली तरी अनेक सुविधांपासून वंचित आहेत. येथे येणाऱ्या प्रवाशाला स्थानकात पोहचल्यानंतर इंटरनेटवरून काम करण्याची गरज भासली तर जवळपास कोणत्याही प्रकारची सुविधा या भागात उपलब्ध नव्हती. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कामे प्रवासाच्या काळात पूर्णपणे खोळंबून जायची. हीच अडचण लक्षात घेऊन या दुर्लक्षित स्थानकांमध्ये वायफाय सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. देशातील मोठय़ा विमानतळांवर वायफायची मोफत सुविधा मिळत असली तरी रेल्वे स्थानकांवर मात्र ही सुविधा सुरू करण्याचा केवळ विचार सुरू आहे. अखेर मंगळवारी या भागात वायफाय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. स्थानकात जमलेल्या अनेक युवकांनी आपल्या मोबाइलवरून सुविधेचा वापर करण्यास सुरुवात केली.
इंटरनेटचा चांगला वेग आणि मोफत मिळत असलेली ही सुविधा वापरण्यासाठी तरुणांची गर्दी सकाळी कळवा आणि मुंब्रा स्थानकात उडाली होती. कळवा अथवा मुंब्रा स्थानकात पोहचल्यानंतर वाय-फाय सिग्नल मिळतो. त्यानंतर येणाऱ्या होमपेजवर वापरकर्त्यांचे नाव, ईमेल आयडी, फोन नंबर असा अर्ज भरल्यानंतर वापरकर्त्यांच्या मोबाईलवर पासवर्ड पाठवला जातो. त्यानंतर पुन्हा होमपेजवर जाऊन फोननंबर आणि पासवर्ड टाकून अर्धा तास या सेवेचा लाभ घेऊ शकता. त्यानंतर पुन्हा नोंदणी करणे गरजेचे बनते. तसेच प्रत्येक वेळी वापर करताना नोंदणी करणे गरजेचे असणार आहे. सुरुवातीची ही प्रक्रिया थोडी किचकट असल्याचा सूर तरुणांचा होता. मात्र मोफत सुविधा घेताना ही प्रक्रिया सुरक्षेच्या दृष्टीने गरजेची बनली आहे.   
वाय-फाय म्हणजे काय रे भाऊ?
उद्घाटनाचा कार्यक्रम म्हटला की मोठा सोहळा असे वातावरण असते. फीत कापणे आणि शिलान्याससारखा कार्यक्रम असतो मात्र अशा प्रकारचे कोणतेच वातावरण नव्हते. फक्त वायफाय सुरूझाला. याची केवळ अधिकृत घोषणा इथे झाली. यावेळी कार्यक्रमात आलेल्या ज्येष्ठांचा आणि तेथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मात्र मोठे कुतूहल होते. त्यामुळे ती मंडळी ‘वायफाय’ म्हणजे काय रे भाऊ? असा प्रश्नसुद्धा विचारत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wifi service in kalwa mumbra railway stations
First published on: 30-07-2014 at 07:01 IST