मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस बिकट स्थिती धारण करत असून वेगवेगळ्या कारणांमुळे वन्यप्राण्यांच्या मृत्यूचा आकडा वाढत असताना दुसरीकडे त्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्याही विस्तारत असल्याचे पुढे आले आहे. नाशिक वनवृत्त क्षेत्रात तीन वर्षांत ११९ वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला असून त्यात सर्वाधिक संख्या काळविटांची आहे. त्या खालोखाल बिबटय़ा, मोर, तरस, चिंकारा व कोल्हा यांचा समावेश आहे. यामागे अपघात, विषप्रयोग, विहिरीत पडल्याने अन् शिकारीचा प्रयत्न अशी काही कारणे दिसतात. बिबटय़ा व लांडग्यांच्या हल्ल्यात पाच वर्षांत १० जणांना प्राण गमवावे लागले तर ७३ जण जखमी झाले. या शिवाय, ३,३०१ शेळ्या, मेंढय़ा हे पाळीव प्राणी वन्यप्राण्यांनी फस्त केले. हा संघर्ष कसा आटोक्यात येणार यावर दोन्ही घटकांचे अस्तित्व अवलंबून आहे.
निसर्ग आणि वन्यजीव यांच्याविषयी नव्या पिढीत आस्था वाढविण्यासाठी वन विभागाने १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत वन्य जीव सप्ताहांतर्गत जनजागृतीपर उपक्रम हाती घेतला असताना मानव आणि वन्यजीव यांच्यातील प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्ष संघर्षांवर ही आकडेवारी प्रकाश टाकत आहे. नाशिक वनवृत्तात पूर्व नाशिक, मालेगाव उपविभाग, पश्चिम नाशिक, अहमदनगर व संगमनेर उपविभाग यांचा समावेश होतो. या क्षेत्रातील एकंदर स्थितीचा आढावा घेतल्यास धक्कादायक वास्तव निदर्शनास आले आहे. बिबटय़ांचा मुक्त संचार हा अलीकडच्या काळात सर्वाच्या चिंतेचा विषय. ऊस हे त्यांच्या अधिवासाचे आवडते ठिकाण. नागरी वसाहतीत भक्ष्याच्या शोधार्थ येणारा भटकणारा बिबटय़ा आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यातील संघर्षांचा तो केंद्रबिंदू ठरला. त्यात कधी बिबटय़ा तर कधी मानवाला प्राण गमवावे लागले. २०११ ते सप्टेंबर २०१३ या कालावधीत दरवर्षी अनुक्रमे १६, १३ आणि चार अशा एकूण ३३ बिबटय़ांचा मृत्यू झाला. बिबटय़ा हिंस्त्र श्वापद तर काळवीट हा अतिशय भित्रा प्राणी. कळपात राहणारा. परंतु, त्यालाही मानवनिर्मित संकटांचा सर्वाधिक सामना करावा लागतो. येवला, ममदापूर, राजापूर आणि शेजारील अहमदनगर परिसरात त्यांचे वास्तव्य आहे. नाशिक जिल्ह्यातील उपरोक्त क्षेत्रात बहुतांश विहिरींना कठडे नाहीत. परिणामी, भ्रमंती करताना कुत्रे मागे लागल्याने सैरभैर झालेले काळवीट कथडा नसलेल्या विहिरीत जाऊन पडते. आजवर जिल्ह्यात जितक्या काळविटांचे मृत्यू झाले, त्यामागे हे महत्वाचे कारण असल्याचे वन्यजीव संरक्षण विभागाने म्हटले आहे. नगर जिल्ह्यात अपघातामध्ये बहुतेक काळविटांचा मृत्यू झाला. म्हणजे, मानवी विकासाला गती देणारे रस्ते आणि मार्ग काळविटांच्या जीवावर बेतल्याचे दिसते. नाशिक व नगर जिल्ह्यात तीन वर्षांत एकूण ६० काळविटांना प्राण गमवावे लागले.
तीन वर्षांत एकूण १६ मोरांचा मृत्यू झाला. काही महिन्यांपूर्वी येवला तालुक्यात एकाचवेळी २० ते २२ मोरांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची चौकशी सुरू असल्याने ही आकडेवारी समाविष्ट नाही. शेतात विहरणारा मोर पिकांची नासाडी करतो म्हणून शेतकऱ्यांकडून विष प्रयोगाचा मार्ग अनुसरला जातो. अर्थात राष्ट्रीय पक्षीही संघर्षांतून सुटलेला नाही. या व्यतिरिक्त सात तरस, दोन चिंकारा आणि एका कोल्ह्याचाही मृत्यू झाल्याची माहिती वन्य जीव संरक्षक विभागाने दिली.
नागरी वसाहतीत शिरकाव करणाऱ्या वन्य प्राण्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. गत पाच वर्षांत बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात आठ ठार तर ४८ जण जखमी झाले. लांडग्याच्या हल्ल्यात दोन ठार तर २५ जण जखमी झाले. उसाच्या क्षेत्रात वास्तव्य करणे पसंत करणाऱ्या बिबटय़ाचे पाळीव प्राणी हे खरे भक्ष्य. त्यामुळे त्याच्या भक्ष्यस्थानी पडणाऱ्या पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. बिबटय़ाच्या हल्ल्यात २९३२ शेळ्या, मेंढय़ांना तर लांडग्यांच्या हल्ल्यात ही संख्या ३६९. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणाऱ्या या नुकसानीपोटी वन विभाग नुकसान भरपाई देत असतो. बिबटय़ाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना यापूर्वी दोन लाख रूपयांची मदत दिली जात असे. आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार पाच लाख रूपये मदतीपोटी दिले जातात. आतापर्यंत १० जणांना या स्वरूपाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यास शासनाचा निकष आहे बैल व गायीसाठी प्रती दहा हजार आणि मेंढी व बकरीसाठी प्रत्येकी तीन हजार. त्याचा विचार करता मागील पाच वर्षांत नुकसान भरपाईपोटी लाखो रूपयांची रक्कम वाटण्यात आली आहे. पण, हा संघर्ष अजून तसाच सुरू आहे. या संघर्षांस सर्वाधिक जबाबदार कोण, याची चर्चा सतत होत असली तरी मानवाचा त्यात अधिक हातभार मानले जाते. त्यास कारण म्हणजे जनजागृतीचा अभाव.