सध्या उरण, पनवेल तालुक्यांतील अनेक गावांतून आगरी समाजात लग्नातील खर्चिक साखरपुडे, हळदी समारंभ यामध्ये दिखाऊपणा माजू लागला आहे. याचा फटका समाजातील कनिष्ठ वर्गाला बसत असल्याने सदृढ व विचारी समाजासाठी या रूढींना हद्दपार करण्यासाठी समाजाने एकत्रित यावे, याकरिता नागाव येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले होते. चर्चासत्रात अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडून समाजात जनजागृती करण्याचा निर्धार जाहीर केला. त्यासाठी तरुणांनी पुढाकार घेण्याचेही आवाहन करण्यात आले.
आर्थिक तसेच सामाजिक व शैक्षणिक अशा तीनही पातळींवर मागास समाज म्हणून ज्याची ३० वर्षांपासून चर्चा होत होती. त्या आगरी समाजाची उन्नती होऊ लागली आहे. समाजातील तरुण उच्चशिक्षित होऊ लागला आहे. तसेच आगरी परिसरातील शेती विविध कारणांसाठी संपादित झाल्याने तसेच शेतकऱ्यांनी शेतीची विक्री केल्याने समाजात काही प्रमाणात आर्थिक सुबत्ताही आलेली आहे. यातूनच चंगळवाद फोफावू लागला असून, त्याचा परिणाम दौलत उधळण्यातच अधिक झाला आहे. त्याचप्रमाणे सामाजिकदृष्टय़ाही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. अगदी साध्या व कौटुंबिक पद्धतीने होणारे लग्न समारंभातील साखरपुडे व हळदी समारंभ आता पंचातारांकित होऊ लागले आहेत.
लग्न समारंभा पेक्षा अधिक खर्च व भपका या दोन घरगुती समारंभांवर केला जात आहे. याचा परिणाम आजही आर्थिकदृष्टय़ा कमजोर असलेल्या समाजातील बहुसंख्य घटकांवर होऊन अनेक कुटुंबांना कर्जाच्या ओझ्याखाली जीवन जगावे लागत आहे, तर दुसरीकडे याच समारंभातून अल्पवयीन तरुणपिढी व्यसनाधितेकडे वळू लागली आहे. याबाबत या चर्चासत्रात विचारमंथन करावे लागले. याविरोधात तरुणांनी पुढे येऊन सभ्य समाज आणि मूल्यांवर आधारित समारंभाचा आग्रह धरून समाजातील प्रत्येक घटकाला आनंद प्राप्त होईल, या वृत्तीने सामाजिक कार्य पार पाडावे, असे आवाहन या चर्चासत्रातून करण्यात आले. चर्चासत्रात आगरी समाज परिषदेचे नेते का.ध. पाटील, नाना पाटील या ज्येष्ठांनी सहभाग घेतला होता.