विदर्भात गेल्या दोन दिवसापासून थंडीचा कडाका बसला असून सर्वाधिक कमी तापमानाची नोंद यवतमाळात ९.५ अंश सेल्सिअस झाली आहे. नागपूरचे किमान तापमान १०.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. गेल्या तीन दिवसापासून विदर्भात थंडीचा जोर वाढला आहे.
हुडहुडी भरावी एवढी थंडी आता जाणवू लागली आहे. विदर्भात तापमानदर्शक यंत्रातील पारा दिवसेंदिवस खाली घसरत असल्याचे आठवडय़ातील आकडेवर नजर टाकली असता स्पष्ट होते. यंदाची दिवाळी गुलाबी थंडीत घालविण्याचा आनंद विदर्भवासीयांना मिळाला आहे. विदर्भात यवतमाळ व नागपूर शहराचे कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा चार ते नऊ अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. मंगळवारी यवतमाळचे कमाल तापमान २८.६ तर किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअस, नागपूरचे कमाल तापमान २९.९ तर किमान १०.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. अकोला कमाल ३१.१, किमान ११.७ अंश से., अमरावती कमाल २९.२ व किमान १४.४ अंश से., बुलढाणा किमान तापमान १४.६ अंश से., चंद्रपूर कमाल २९.८ व किमान १५.८ अंश से, वर्धा २९.९
व १२.५, वाशीम २९.६ व १२, गोंदिया येथे
२४.५ व १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
यवतमाळ शहर दोन दिवसापासून थंडीने गारठून गेले आहे. सोमवारी यवतमाळात ८.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीच्या ९ अंशाने कमी आहे.
चौकाचौकात शेकोटय़ा पेटवून आणि गरम कपडे घालून नागरिक थंडीपासून बचाव करीत आहेत. आणखी दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.