उत्तर महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी आतापर्यंत केवळ २८ टक्के पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे ३८ टक्के पेरण्या नंदुरबारमध्ये, तर सर्वात कमी १७ टक्के पेरणी नाशिक जिल्ह्यात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी ५२०४ हेक्टर प्रस्तावित क्षेत्र आहे. त्यातील १०८२ हेक्टरवर प्रत्यक्षात पेरणी झाल्याचे या विभागाने म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिकला अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. त्यात डाळिंब, द्राक्ष, कांदा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. जवळपास २० हजार एकर क्षेत्रावरील पिकांचे पावसाने नुकसान केल्याचा अंदाज आहे. नैसर्गिक संकटांच्या मालिकेत सापडलेल्या उत्तर महाराष्ट्रात रब्बी हंगामाची पेरणी सध्या प्रगतिपथावर आहे. त्यात नाशिक जिल्ह्यात कमी पेरणी झाल्याचे लक्षात येते. जिल्ह्यात रब्बी हंगामात पेरणीसाठी १६५१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून, त्यापैकी केवळ २३४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात प्रस्तावित असणाऱ्या ७२५ हेक्टरपैकी २६१ हेक्टरवर प्रत्यक्षात पेरणी झाली आहे. धुळे जिल्ह्यात प्रस्तावित ९५७ हेक्टरपैकी प्रत्यक्षात १५८ हेक्टरवर, तर जळगावमध्ये २८ टक्क्यांहून अधिक पेरणी झाली आहे. १८३३ हेक्टरच्या प्रस्तावित क्षेत्रापैकी ४२९ हेक्टरवर प्रत्यक्षात पेरणी झाली आहे.
रब्बी हंगामातील पेरणीचा पीकनिहाय विचार केल्यास तृणधान्य व कडधान्याची अधिक लागवड झाल्याचे दिसते. रब्बी ज्वारीसाठी आतापर्यंत ३८३ हेक्टरवर पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. धुळे जिल्ह्यात त्याची सर्वाधिक ९३ टक्के आकडेवारी आहे. उत्तर महाराष्ट्रातील एकूण प्रस्तावित क्षेत्राचा विचार केल्यास पेरणीचे प्रमाण ४२ टक्के इतके आहे. गव्हाच्या प्रस्तावित २०९९ क्षेत्रापैकी १८४ हेक्टर, मक्याची प्रस्तावित ४८५ पैकी १४९ हेक्टरवर, तर ई-तृणधान्याची प्रस्तावित नऊपैकी ७.४४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकूण तृणधान्यासाठी उत्तर महाराष्ट्रात ३४४८ प्रस्तावित क्षेत्र असून त्यापैकी ७२४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभऱ्याची १६८५ पैकी ३४३ हेक्टरवर प्रत्यक्षात पेरणी झाली आहे. कडधान्याची आतापर्यंत १७२४ पैकी ३४९ हेक्टरवर प्रत्यक्षात पेरणी झाली आहे. करडई ६.७७ टक्के, तर सूर्यफुलाची ७.६३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2014 रोजी प्रकाशित
उत्तर महाराष्ट्रात रब्बीची १०८२ हेक्टरवर पेरणी
उत्तर महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी आतापर्यंत केवळ २८ टक्के पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
First published on: 26-11-2014 at 08:18 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter season cropping in north maharashtra