खोल्यांचा ताबा घेतलेल्या लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांंची कर्मचाऱ्यांना मात्र दमदाटी

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सात दिवसांवर आले असताना राज्यातील विविध भागातून येणाऱ्या लोकप्रतिनिधींची निवास व्यवस्था असलेल्या आमदार निवासात अजूनही रंगरंगोटी आणि डागडुजीची कामे सुरू आहेत. विदर्भातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांंनी खोल्या ताब्यात घेतल्या असून कर्मचाऱ्यांवर दमदाटी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला १० डिसेंबरपासून प्रारंभ होणार असल्यामुळे आमदार निवास परिसरात विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांंची वर्दळ वाढली असून अनेक लोकप्रतिनिधींच्या स्वीय सचिवांनी आणि कार्यकर्त्यांंनी खोल्यांचा ताबा घेतला आहे. आमदार निवासमधील इमारत क्रमांक १ व ३ मधील सर्व खोल्यांचे काम जवळपास पूर्ण झाले असले इमारत ३ मध्ये काही खोल्यांमध्ये रंगरंगोटी आणि डागडुजीचे काम सुरू आहे. साहेबांची खोली चांगली असली पाहिजे, टीव्ही, फ्रिज, अलमारी, डीनरसेट, दूरध्वनी, टेबल खुच्र्या, आरामासाठी पलंग आदी व्यवस्था खोलीमध्ये असली पाहिजे, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर दडपण आणले जात आहे. खोल्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक कामगारांवर दमदाटी करून त्यांना कार्यकर्त्यांंकडून कामे सांगितली जात असल्याचे दिसून आले.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची निवासाची व्यवस्था आमदार निवासात करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सर्व व्यवस्थेची पाहणी करून कुठे काही कमी पडू, याची दक्षता घेत आहेत. जवळपास बहुतेक आमदारांच्या खोल्या ठरल्या असल्यामुळे फारसा बदल राहणार नाही. विदर्भातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदारांचा शहरातील विविध पंचातारिकत हॉटेल्समध्ये निवास व्यवस्था केली जात असल्यामुळे त्यांच्या नावाने असलेल्या खोल्यांचा ताबा स्वीय सचिव किंवा कार्यकर्त्यांंकडे असतो.
अनेक आमदार तर आमदार निवासकडे या काळात फिरकतही नसल्याचा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव असल्यामुळे यावर्षी आमदार किंवा त्यांचे स्वीय सचिव खोलीमध्ये राहत असतील तर परवानगी देणार असल्याचे सांगण्यात सार्वजानिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.  
अधिवेशनाच्या निमित्ताने दरवर्षी आमदार निवासाची आतून बाहेरून रंगरंगोटी केली जात असून त्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. दरवर्षी खोल्यामधील सामान सुद्धा नवीन दिले जात असल्यामुळे त्यावरही मोठय़ा प्रमाणात खर्च होत असतो. इमारत क्रमांक एकमध्ये १३२ खोल्या, दोनमध्ये १८३ व तीनमध्ये ३२ खोल्या आहेत. बहुतेक सर्व खोल्यांचे वाटप आमदारांच्या नावाने करण्यात आले आहे.
 आमदार निवासातील खोल्यांचे वाटप सांसदीय मंडळाचे व आमदार निवासाच्या अध्यक्षांकडे असते. विधि मंडळाच्या दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष व सभापती यांच्या २०, विद्यार्थी १०, विधानसभा सदस्य २५०, विधाानपरिषद सदस्य ७५, विविध मंत्री ६० व इतर १०, असे खोल्यांचे वाटप केले जाते. इमारत क्रमांक एकचा दुसरा मजला महिला आमदारांसाठी व त्यांच्या कार्यकार्यत्यासाठी राखून ठेवला आहे. माजी आमदारांना आमदार निवासात राहायचे असेल तर आमदार निवास समितीचे अनुमतीपत्र आणणे आवश्यक असते. यावर्षी विविध पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांसाठी दोन खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.     
देवगिरी बंगल्यात कोण राहणार?
सिंचन घोटाळ्यावरून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवगिरी बंगल्यात कोण राहणार, हे अजूनही अनिश्चित असले तर दादांसाठी आमदार निवासमधील ११ क्रमांकाची खोली आरक्षित करून ठेवण्यात आली आहे. सिंचन घोटाळ्यावरून दादांना सरकारने क्लिन चीट दिली असली तरी ते उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारतील की नाही, हे मात्र अजूनही निश्चित झाले नाही. येत्या काही दिवसात काही मंत्रिमंडळात फेरबदल झाले तर निवासाची मंत्र्यांची आणि आमदारांची निवास व्यवस्था बदलण्याची शक्यता आहे, अन्यथा दादांना खोली क्रमांक ११ शिवाय सध्या तरी पर्याय नाही. यापूर्वी आर.आर. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, दिवं. विलासराव देशमुख यांना अधिवेशनापूर्वी वेगवेगळ्या कारणांवरून पदावरून पायउतार व्हावे लागले होते त्यामुळे त्यांची व्यवस्था सुद्धा आमदार निवासात करण्यात आली होती.