जगातील सर्वात जुन्या उद्योगात काम करणाऱ्या शेतमजुरांपासून ते आजच्या खाजगी अत्याधुनिक संगणक क्षेत्रातील अकुशल काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा कामगार या संवर्गात मोडतो. देशात बहुसंख्य नागरिक कामगार म्हणून काम करतात. संघटीत क्षेत्रातील कामगारांना पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्या तरी शासनाकडून सुविधा मिळतात, परंतु असंघटीत कामगारांसाठी शासनाच्या कोणत्याही योजना व संरक्षण नसल्याने असंघटीत कामगार दिशाहीन व आर्थिक गर्तेत सापडलेला असल्याने त्यास या खाईतून काढण्यासाठी असंघटीत कामगारांच्या सर्वंकष सुरक्षेसाठीचा कायदा शासनाने करावा, असे येथील कामगार मेळाव्यात आमदार विजयराज शिंदे यांनी सांगितले.
गर्दे वाचनालयाच्या सभागृहात अलीकडेच जिल्ह्य़ातील सर्व असंघटीत कामगारांच्या न्यायासाठी मेळावा आयोजित केला. त्याप्रसंगी आमदार विजयराज शिंदे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर उपस्थित होते. व्यासपीठावर सहाय्यक कल्याण आयुक्त प्र.देशमुख, सहाय्यक कामगार आयुक्त प्र.महल्ले, सेवानिवृत्त कामगार अधिकारी राजपुत, प्रा.सुभाष लहाने, प्रकाश देशलहरा, शे.शगीर शे.नजीर, शांताराम जगताप, रमेश तोंडीलायता, पंजाबराव गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते.
ते म्हणाले की, बांधकाम, घरेलू, खाजगी, औद्योगिक व व्यावसायिक उद्योगात काम करणाऱ्या मजूर व त्यांच्या कुटुंबीयांच्या उज्वल भविष्यासाठी शासन काम करीत असून त्यासाठी शासनाने त्यांच्या स्तरावर उपाययोजना करून त्यांना जास्तीत जास्त फायदा देण्याचे काम करावे, त्यासाठी शासनाने सहकार्य करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर म्हणाले की, घरेलु कामगार, इमारत बांधकाम कामगार, माथाडी कामगार आदि कामगार याबाबत संबंधित विभागाने अद्यावत याद्या अद्यावत कराव्यात व त्यांच्या फायदा कामगारांना द्यावा जर त्यासाठी कर्मचारी कमी पडत असतील तर याबाबत प्रत्येक तहसिल कार्यालय येथे कामगार कल्याण कार्यालयाचा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत १३ तालुक्यात शिबार आयोजित करण्याबाबत सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यांनी मेळाव्यातील लाभार्थ्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदार कार्ड किती व्यक्तीकडे आहेत, असे विचारले असता सर्वानी हात उंचावून त्यांना प्रतिसाद दिला. त्या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, नोंदणीसाठी यासोबत फॉर्म भरून सर्वानी त्यांचा फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.        कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष लहाने यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा.अमोल शेवडे व आभार प्रकाश देशलहरा यांनी मानले. या वेळी जिल्ह्य़ातील मोठय़ा संख्येने असंघटीत महिला व पुरुष सहभागी झाले होते.