शिवसेना नागपूर शहराच्या वतीने रेशीमबाग चौकातील शिवसेना भवनात तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात आले असून मिळालेल्या तक्रारीनुसार घनश्याम नंदनवार यांच्याकडे स्पॅन्कोने धाड टाकल्यावर शिवसैनिकांनी त्यांच्या कार्यालयावर धडक देऊन स्पॅन्कोने केलेल्या कारवाईचे पितळ उघड पाडले असल्याचा दावा जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी केला आहे.
रिंग रोडवरील श्रीनाथ साईनगर येथे राहणाऱ्या घनश्याम नंदनवार यांच्याकडे २० मे रोजी सकाळी ६ वाजता स्पॅन्कोने धाड टाकली. रूममधील व्हिडीओ रेकॉर्डिग करून त्यांचे वीज मीटर काढून पंचनामा केला, परंतु पंच म्हणून स्पॅन्कोच्या कर्मचाऱ्यांनीच आणलेल्या लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन लगेच २,७८,३३ रुपयाचे बिल त्यांच्या हातात दिले. दोन दिवसात पैसे न भरल्यास कनेक्शन बंद करण्याची धमकी दिली. शिवसेनेकडे तक्रार केल्यानंतर युवासेनेचे आकाश पांडे, शशिकांत ठाकरे, अक्षय मेश्राम, काली पांडे यांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन त्यांची व्हिडीओ रेकॉर्ड दाखवण्याची मागणी केली. जे मीटर जप्त केले ते ग्राहकाच्या समोर सील केले नाही हे लक्षात आणून दिल्यावर कंपनीची चूक त्यांच्या लक्षात आली. अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन लगेच त्यांची वीज सुरू करून दिली व त्यांचे मीटर टेस्टिंगसाठी पाठवले. शिवसेनेकडे आतापर्यंत २५ तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व कागदपत्रांची तपासणी व यासंबंधीचा करारनामा तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची नियमावली तपासून एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांशी शिवसेनेचे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. वीज वितरण कंपनीच्या दडपशाहीपासून जनतेला वाचवण्याचा विश्वास जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी व्यक्त केला आहे.