‘संतोष पवारांचं नाटक म्हणजे फुल्टू मनोरंजन’ असं समीकरण रूढ आहे. त्यांची स्वत:चीही याला ना नाहीए. प्रेक्षकांचं रंजन करण्यात आपण काही गैर करतोय असं त्यांना बिलकूलच वाटत नाही. आणि ते बरोबरही आहे. कुठल्याही कलेचं रंजन हे एक अंग असतंच. परंतु त्याचबरोबरीनं आपल्या नाटकांतून आपण काहीएक सामाजिक संदेशही देतो असं जे त्यांचं म्हणणं आहे, ते वरकरणी पाहता चुकीचं म्हणता येणार नाही. मात्र, त्यांच्या नाटकांतली सामाजिकता ही बहुतांशी तोंडीलावणं म्हणूनच येते. त्यांच्या नाटकात रंजनाचाच भाग इतका पॉवरफुल असतो, की त्यातला सामाजिक संदेश वा भाष्य कुणी गांभीर्यानं घेण्याची शक्यता तशी शून्यच! (जिथं गंभीर, आशयसंपन्न नाटकांतून केलेलं सामाजिक भाष्य प्रेक्षक नाटय़गृहाबाहेर पडल्यावर लगेचच विसरतात, तिथं अशा तद्दन रंजनपर नाटकांचं काय हो?) असो. त्यांचं ‘यंदा कदाचित’ हे नवं नाटक कधीकाळी येऊन गेलेल्या त्यांच्या एका जुन्या नाटकाचीच सुधारीत आवृत्ती आहे. त्यातली पात्रं आता काहीशी विस्मृतीत गेलेली आहेत. रिंकू पाटील, अमृता देशपांडे किंवा त्यांच्यासारख्याच अनेक निष्पाप मुलींची माथेफिरू तरुणांनी केलेली विटंबना आणि हत्या त्याकाळी बऱ्याच गाजल्या होत्या. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनांचं स्मरण अलीकडेच घडलेल्या तरुणींवरील अत्याचारांच्या काही घटनांमुळे पुन्हा एकदा ताजं झालं आहे. या पाश्र्वभूमीवर संतोष पवारांचं ‘यंदा कदाचित’ हे नाटक यावं, हे उचितच होय. परंतु या नाटकातला मोठा दोष हा आहे, की त्यात मनोरंजनाचा मसालाच इतका ठासून भरलेला आहे, की त्यात मांडलेला सामाजिक आशय त्यात पार वाहून जातो. नाटकात मंगळागौरीच्या निमित्तानं भोंडला खेळायला स्त्रिया एकत्र जमतात. परंतु त्यांचा खेळ प्रत्यक्ष सुरू होण्याआधीच त्यांच्यात दोन तट पडतात. एक गट चित्रपट, नाटक आणि सीरियल्समधल्या गाजलेल्या नायिकांचा आणि दुसरा खलनायिकांचा. त्यात आणखी इतिहास वा पुराणकाळातली एखादी भोंडला खेळायला आली की हे दोन्ही गट एकत्र येऊन तिला हाकलूनच देतात. तिच्या निमित्तानं नस्ता वाद उभा राहायला नको म्हणून!
यातल्या प्रत्येकीचं आपलं आपलं असं एक दु:ख आहे. स्त्री म्हणून.. पत्नी म्हणून. या ना त्या प्रकारे पुरुषी दमन व शोषणाच्या त्या बळी आहेत. मात्र, जुलमी पुरुषी प्रवृत्तीविरुद्ध एकत्रितपणे आवाज उठविण्याऐवजी या साऱ्याजणी आपापसातच तंडत बसतात. बॉबी डार्लिग नावाचा तृतीयपंथी त्यांना पुरुषी शोषणाविरोधात एकजुटीने उभे करण्यासाठी बराच आटापिटा करतो. मात्र त्यालाही त्या जुमानत नाहीत. एकत्र येण्याचं सोडाच; परस्परांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यातच त्या धन्यता मानतात. एका आगंतुक सामान्य स्त्रीच्या येण्यानं मात्र त्या काहीशा भानावर येतात. त्या स्त्रीचं दु:ख हलकं करताना एकमेकींच्या जवळ येतात. पुरुषसत्तेविरोधात सामना करण्यासाठी कटिबद्ध होतात.
अशा ढोबळ संकल्पनेभोवती हे नाटक संतोष पवार यांनी गुंफलं आहे. त्यातही स्त्रियांमधल्या दुहीचं चित्रण करताना त्यांनी उथळ विनोदाचाच अधिक आधार घेतलेला आहे. काही वेळा तर त्यांना नवं काही सुचत नाहीए अशी शंका यावी इतके पकाव संवाद त्यांनी लिहिले आहेत. नाटक-चित्रपटांतील विद्यमान नायिका व खलनायिकांचा अभ्यास मात्र त्यांनी बऱ्यापैकी केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या लकबी, वागणं-बोलणं, त्यांची कमजोरी वगैरे गोष्टी त्यांनी अचूक टिपल्या आहेत. अर्थात प्रेक्षकांच्या रंजनाकरता त्यांनी त्याचा जरा अतिच वापर केला आहे, ते सोडा. त्यामुळे सुरुवातीला या क्लृप्तीच्या चपखल वापराबद्दल मिळणारा प्रतिसाद पुढे हळूहळू पातळ होत जातो. नाटकाच्या एकूण आलेखाबाबतही त्यांनी फारसा विचार केलेला नाही हे सतत जाणवत राहतं. नाटक एकाच रिंगणात कायम फिरत राहतं. दिग्दर्शक म्हणून त्यांची कामगिरी रिंगमास्टरसारखी आहे. त्यातही नाटकाचा जो फॉर्म त्यांनी निवडलाय त्यात नाच, गाणी, मिमिक्री या सगळ्याला भरपूर वाव असल्यानं आपल्या कलाकारांकडून ते त्यांनी चोख करवून घेतलंय. बरं, जुन्या आणि गाजलेल्या गाण्यांच्या चालींवर हे सगळं करायचं असल्यानं रिस्क फॅक्टरही कमी आणि प्रेक्षकांच्या हमखास मनोरंजनाचीही हमी. डबल धमाका! ‘व्हरायटी एन्टरटेन्मेंट’ या सदरात मोडणारं हे नाटक तसंच आहे याची त्यांना स्वत:लाही पूर्ण जाणीव असल्यानं नाटकाअखेरीस निवेदनाद्वारे त्यांनी ही वस्तुस्थिती मान्यही केली आहे. नाटकाचं नेपथ्य त्यांचंच आहे. पारंपरिक प्रकारांतल्या साडय़ांचा वापर त्यांनी पाश्र्वपडद्यासारखा केलेला आहे. अन्य तांत्रिक बाबीही ठाकठीक.  सर्व कलाकारांनी समरसून कामं केली आहेत. त्यातही जिच्या तिच्या नैसर्गिक व्यक्तिमत्त्वानुसार चपखल बसेल अशी भूमिका संतोष पवार यांनी प्रत्येकीला दिलेली आहे. कुणाला भडक, तर कुणाला साधी-सरळ, सोज्वळ. आणि प्रत्येकीनं दिग्दर्शकास अपेक्षित असलेलं त्या- त्या भूमिकेत सर्वस्वानं दिलं आहे.  संतोष पवार यांनी वर्तमान समाजवास्तवास अधिक गांभीर्यानं आणि सखोल अभ्यासानं भिडायचं ठरवलं तर भविष्यात ते एखादं चांगलं सामाजिक नाटक देऊ शकतील. परंतु तूर्तास तरी त्यांचा नाटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहता त्यांच्याकडून ही अपेक्षा धरता येत नाही, हेही तितकंच खरंय.