राज्य शासन व आयआरबी कंपनीने टोल आकारणीच्या हालचाली गतिमान केल्या असतांना टोलविरोधात शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून टोल आकारणीस विरोध दर्शविला. या मोर्चात शहरातील सुमारे १५ महाविद्यालयांतील ३ हजारांवर विद्यार्थी,विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. ज्येष्ठ नागरिकांनी सुरू केलेल्या टोलविरोधी आंदोलनात तरूणाईसुध्दा आक्रमकपणे सहभागी झाल्याचे चित्र या निमित्ताने पहायला मिळाले.    
कोल्हापूर शहरात २२० कोटी रूपये खर्च करून रस्ते विकासाचा प्रकल्प साकारला आहे. आयआरबी कंपनीने हे काम केले असून कामांमध्ये अद्याप बऱ्याच त्रुटी आहेत. त्या दूर करण्याऐवजी आयआरबी कंपनीकडून टोल वसुलीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शहरातील सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने टोल विरोधात गेल्या दोन वर्षांपासून जनआंदोलन उभे केले आहे. विविध प्रकारची आंदोलने करीत टोल आकारणीस जोरदार विरोध दर्शविला आहे. या आंदोलनांतर्गत आज तरूणाई सहभागी झाली. दसरा चौक येथून मोर्चाला सुरूवात झाली. शहरातील पंधराहून अधिक महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्साहाने सहभागी झाले होते. याचबरोबर विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आपापले झेंडे घेऊन मोर्चात उतरले होते. यामुळे अनेक दिवसानंतर विविध विद्यार्थी संघटनांचे ध्वज बऱ्याच दिवसानंतर एकत्रित फडकल्याचे दिसत होते. मोर्चामध्ये झांजपथकासह अन्य वाद्यांचा निनाद होत असल्याने तरूणाई त्या तालावर घोषणा देत होती.     मुख्य मार्गाने फिरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे टोलविरोधी कृती समितीसह महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ठिय्या आंदोलन केले. टोल विरोधास जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार यांना भेटले. त्यांना टोलची आकारणी कशी अन्यायकारक आहे, याची सविस्तर माहिती दिली. या चर्चेत शिवाजी विद्यापीठ स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष श्रीधर पाटील, शिवाजी माळी, राहुल कांबळे, सुनील शिंदे, अमोल शिंदे, दिलदार मुजावर,हिदायत मुजावर, ज्योती भालकर आदींचा समावेश होता. या आंदोलनाला पाठिंबा देत ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील, सुभाष वोरा, धनंजय महाडिक, रामभाऊ चव्हाण, बाबा इंदूलकर, महेश जाधव, कॉ.रघुनाथ कांबळे आदी सहभागी झाले होते.