‘द साउंड ऑफ म्युझिक’ या चित्रपटाची आठवण निघाली की डोळ्यांसमोर येते व्हॉन ट्रॅप कुटुंब. ती सात चुणचुणीत मुले, त्यांचा तो अत्यंत देखणा बाप आणि पत्नी निवर्तल्यामुळे त्याच्या पोरांची देखभाल करण्यासाठी आलेली खटय़ाळ पण गोंडस गव्हर्नेस. एक ऑस्ट्रियन अधिकारी नाझींच्या कचाटय़ातून कुटुंबाला सुखरूप सोडवतो अशी कहाणी. चित्रपट तुफान गाजला. त्यांतील देखणे ऑस्ट्रियन अधिकारी ख्रिस्तोमर प्लमर यांचा चेहरा आणि नाव जगपरिचित झाले. खरे तर हॉलीवूड कारकीर्दीच्या सुरुवातीलाच (१९६५) इतका तुफान लोकप्रिय चित्रपट करण्याची संधी मिळणे हे भाग्यच. पण आयुष्यभर भाग्याचे असे लाचार देणेकरी म्हणून जगणे अभिमानी प्लमर यांनी कधीही स्वीकारले नाही. त्यामुळेच ‘द साउंड ऑफ म्युझिक’मुळे मिळणाऱ्या अलोट लोकप्रियतेची त्यांना पुढे शिसारी येऊ लागली. ‘वेगळे काही दिसत कसे नाही यांना’ असे प्लमर अगदी अलीकडेपर्यंत म्हणायचे. ९१ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य व्यतीत करून प्लमर यांनी गेल्या आठवडय़ात इहलोकाचा निरोप घेतला, तोपर्यंतची काही वर्षे मात्र ख्रिस्तोमर प्लमर आणि ‘द साउंड ऑफ म्युझिक’ या समीकरणाशी त्यांनी बऱ्यापैकी जुळवून घेतले होते.

आयुष्याप्रमाणेच त्यांची अभिनय कारकीर्दही प्रदीर्घ होती. चित्रपटाइतकीच रंगभूमीवरही त्यांनी हुन्नर दाखवली. ते मूळचे कॅनेडियन. शालेय शिक्षण संपताच रंगभूमीकडे वळले. कूबेक प्रांतात वाढल्यामुळे इंग्रजीइतकेच फ्रेंच भाषेवरही प्रभुत्व. अभिनयगुणांमुळे लवकरच अमेरिकेतील नाटय़पंढरीत, अर्थात ब्रॉडवेवर काम करण्याची संधी मिळाली. तेथे १९५९ मध्ये विख्यात दिग्दर्शक एलिया कझान यांच्या ‘जे. बी.’ यांच्या नाटकातील भूमिकेसाठी त्यांना टोनी नामांकन मिळाले. तेथून मग इंग्लंडमधील रॉयल शेक्सपिअर नाटक कंपनीत काम करण्याची संधीही मिळाली. रंगभूमीवरील अभिनयाचा हा प्रवाह पुढे ब्रॉडवे, शेक्सपिअर कंपनीमार्गे हॉलीवूड चित्रपटांकडे वळणारच होता. १९६५ मध्ये ‘द साउंड ऑफ म्युझिक’मुळे मोठी लोकप्रियता लाभूनही प्लमर चित्रपटांइतकेच रंगभूमीवरही सक्रिय राहिले. १९७३, १९९७ आणि २००२ मध्ये त्यांना रंगभूमीवरील भूमिकांसाठी टोनी मानांकन मिळाले. यादरम्यानच्या काळात ‘द बॅटल ऑफ ब्रिटन’, ‘वॉटर्लू’, ‘मर्डर बाय डिक्री’, ‘माल्कम एक्स’, ‘ट्वेल्व्ह मंकीज’, ‘द इनसायडर’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये लक्षणीय भूमिका केल्या.

हा गृहस्थ नवीन सहस्रकात वयाची पंचाहत्तरी उलटल्यानंतरही तन्मयतेने अभिनय करत राहिला. त्यातून निराळेच विक्रम घडले. ते कोणते? तर २०१० मध्ये त्यांना ऐंशीव्या वर्षी ऑस्कर नामांकन मिळाले. दोन वर्षांनी ‘बिगिनर्स’ चित्रपटासाठी पुन्हा नामांकन, पण त्या वेळी त्यांनी ऑस्कर जिंकलेच! ८२ वर्षांचे सर्वात वयोवृद्ध ऑस्कर विजेते. हे जणू कमी म्हणून की काय, ८८व्या वर्षी ‘ऑल द मनी इन द वर्ल्ड’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना चक्क तिसरे ऑस्कर नामांकन मिळाले. अभिनयावर निस्सीम प्रेम, तीक्ष्ण पण तिरकस बुद्धी, स्पष्ट विचार आणि प्रदीर्घ काळ जोपासलेली तंदुरुस्ती हे त्यांचे गुण. दशकानुदशके रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका केल्यानंतर, केवळ एकाच चित्रपटाशी जोडले जाण्याबद्दलचा त्यांचा त्रागा नक्कीच समजण्यासारखा होता.