जनुकांतील चुकलेल्या संगती जर सुसंगत करता आल्या तर आनुवंशिक रोग दूर होतात. त्यासाठी जनुकांची फेरजुळणी करावी लागते. त्याला आपण जनुकीय अभियांत्रिकी म्हणतो. याच जनुकीय उपचारांच्या माध्यमातून अनेक असाध्य रोगही बरे करता येतात. या जनुकीय फेरबदलांच्या वापराने हवी तशी संतती निर्माण करून जैववैविध्य हरवण्याचा नैतिक प्रश्न निर्माण होतो, पण अशा मर्यादा प्रत्येक संशोधनात असतात. जनुकांची फेरजुळणी किंवा दुरुस्ती करण्याचे ‘जीन स्प्लायसिंग’ तंत्र प्रथम वापरले ते स्टॅनफर्ड विद्यापीठाचे जीवशास्त्रज्ञ डेल कैसर यांनी. विषाणूंवर काम करताना डॉ. कैसर यांनी काही डीएनएची जोडणी केली होती. त्यातून ‘जनुकीय अभियांत्रिकी’चा जन्म झाला. कैसर यांच्या निधनाने या तंत्रज्ञानाचा शोधकर्ता आपण गमावला आहे. जनुकीय संपादनाचे तंत्र संकल्पनात्मक पातळीवर डेल कैसर यांनी मांडले होते. निसर्गाचा व्यवहार कसा चालतो याच्या कुतूहलातून त्यांनी संशोधनाचा ध्यास घेतला. आठवडाभर न थकता ते प्रयोगशाळेत काम करीत. आहायो राज्यात १९२७ साली जन्मलेले कैसर यांनी सुरुवातीला स्फोटकांवर प्रयोग केले होते. तुटलेले रेडिओ जोडण्याचे जुगाडही त्यांनी करून पाहिले. वडिलांमुळे त्यांच्या मनात निसर्गप्रेम निर्माण झाले. परडय़ू विद्यापीठात त्यांनी जैवभौतिकशास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर ते कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅलटेक) या संस्थेतून विद्यावाचस्पती झाले. त्याच संस्थेत ते मॅक्स डेलब्रक यांच्या गटाच्या जनुकीय रचनांचा अभ्यास करीत होते. विषाणूंची जिवाणूंना होणारी बाधा कशी असते हे त्यांनी तेथे पाहिले. विषाणू कशामुळे वाढतात याचा अभ्यास केला. नंतर ते पाश्चर इन्स्टिटय़ूटमध्ये अभ्यासासाठी पॅरिसला गेले. तेथून अमेरिकेत परतल्यावर त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठात काम केले. जिवाणूला विषाणूची बाधा होते तेव्हा नेमके काय घडते हे त्यांनी पाहिले होते. त्यांनी काही वितंचके अशी शोधून काढली जी कृत्रिम डीएनए धाग्यांनाही चिकटू शकतील. त्यातून त्यांनी डीएनएचे दोन वेगवेगळे धागे जोडले. यातून जीवशास्त्राचे पायाभूत आकलन बदलले. त्यांनी १९७० च्या दशकात प्रा. ल्यूसी शापिरो यांच्यासमवेत संशोधन केले होते. या दोघांनी नंतर मासे, पक्षी, समूहाने कसे सहचरण करतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यातही त्यांनी काही जैविक दुवे जोडले. एकूण ४०० शोधनिबंध त्यांच्या नावावर होते. अल्बर्ट लास्कर पुरस्कार, वॉटरफोर्ड पुरस्कार, मॉर्गन पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते.