छत्तीसगडमधील चांपा शहरापासून सुमारे आठ किलोमीटरवरील सोठी नावाच्या एका लहानशा गावात कुष्ठरुग्णांच्या सेवेत जीवन समर्पित करणाऱ्या दामोदर गणेश बापट यांनी ‘इदं न मम’ वृत्ती अखेरच्या श्वासापर्यंत व्रताप्रमाणे पाळली. महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्य़ातील पाथ्रोट या गावात जन्मलेल्या बापट यांनी लौकिकार्थाने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण नागपुरात पूर्ण केल्यावर काही काळ वेगवेगळ्या नोकऱ्याही केल्या, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारामुळे, समाजसेवेसाठी स्वतचे जीवन झोकून द्यायचे ठरवून १९७० मध्ये बापट यांनी छत्तीसगडमधील जशपूर गाठले आणि वनवासी कल्याण आश्रमातर्फे ग्रामीण भागातील आदिवासींकरिता चालविल्या जाणाऱ्या एका शाळेत शिक्षकी स्वीकारली. याच काळात त्यांना कुष्ठरुग्णांच्या व्यथांनी व्यथित केले आणि कुष्ठरुग्णांसाठी काम करण्याचे ठरवून त्यांनी वयाच्या २७ व्या वर्षी सोठी येथील सदाशिव कात्रेंच्या आश्रमात पाऊल टाकले. तेव्हापासून बापट आणि कुष्ठरुग्ण यांच्यातील नाते ही सेवाभावाची एक आदर्श कहाणी आकार घेऊ लागली.
आपल्या सेवावृत्तीने बापट यांनी जवळपास २६ हजार कुष्ठरुग्णांच्या जगण्याला आकार दिला. भारतीय कुष्ठरोग निवारक संघाचे सचिव या नात्याने बापट यांनी केलेल्या सेवाभावी कार्याचा गौरव म्हणून गेल्या वर्षी त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ने गौरविले. त्याआधी बापट यांच्या कार्याची दखल घेऊन विविध समाजसेवी संस्था-संघटनांनीही त्यांना सन्मानित केले होते. बापट यांच्या समर्पण वृत्तीचे प्रतीक म्हणून आज सोठी गावातील आश्रमाच्या सुमारे ८५ एकरच्या परिसरात एका स्वयंपूर्ण गावाने आकार घेतला आहे. विद्यार्थी वसतिगृह, शाळा, पाळणाघर, संगणक, शिलाई प्रशिक्षण केंद्र, रुग्णालय, कुष्ठसेवा केंद्र, शेती, गोशाळा, नैसर्गिक खतनिर्मिती, गोबर गॅस, आदी अनेक उद्योगांमुळे हे गाव स्वयंपूर्णही झाले आहे. कुष्ठरुग्णांच्या उपेक्षित जीवनाला प्रतिष्ठा देण्यासाठी आयुष्य वेचणारे बापट आपल्या आयुष्यात या उपेक्षेच्या अनुभवांनाही सामोरे गेले. पण खचून न जाता जगण्याची उमेद कायम ठेवण्याची प्रेरणा त्यांनी कुष्ठरुग्णांमध्ये जिवंत ठेवली. आज त्या आश्रमातील आबालवृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, तो बापट यांनी रुजविलेल्या आत्मविश्वासामुळेच! याच व्रतासाठी वाहून घेतलेल्या बापट यांना गेल्या जुलै महिन्यात मेंदूतील रक्तस्रावामुळे बिलासपूरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि अखंड सेवाव्रताचे व्रत घेणाऱ्या या श्रमर्णीने अंथरूण धरले. १७ ऑगस्ट रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बापट यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या संशोधनाकरिता वैद्यकीय महाविद्यालयास सुपूर्द करण्यात आले. एक सेवाव्रती जीवन संपले, पण देहाने मात्र मृत्यूनंतरही सेवाभाव सोडला नाही.