चित्रकारांपैकी कोणी विद्यार्थीप्रिय कलाध्यापक म्हणून, कोणी मनमिळाऊ सहकारी म्हणून तर कोणी अन्य चित्रकारांना – विशेषत: तरुणांना मदत करणारे ज्येष्ठ चित्रकार म्हणून आठवत राहतात.. दामोदर पुजारे यांच्याठायी हे तिन्ही गुण होतेच, शिवाय आणखीही एक गुण त्यांच्याकडे होता.. आपल्या चित्रप्रदर्शनास आलेल्या कुणाही प्रेक्षकाशी ते अगत्याने बोलत, त्याला या चित्रांमागचे तंत्र समजावून सांगत आणि चित्रविषय काय आहे, हेही एखाद्या वाक्यात सांगून जणू आपल्या चित्रखजिन्याचा आनंद लुटण्याची किल्लीच प्रेक्षकाहाती देत! हे करणे काहीसे आवश्यकही होते, कारण पुजारे यांच्या प्रदर्शनांत अनेकदा वूडकट- म्हणजे काष्ठमुद्राचित्रण- प्रकारातील मुद्राचित्रे असत. रंगांचे थेट फटकारे, भरपूर रंग एवढय़ानेच भुलून जाण्याची सवय असलेले प्रेक्षक आपल्या कलाकृती पाहताना भांबावणार आहेत, त्यांना आपणच मदत केली पाहिजे, ‘लाकडावर आधी कोरून, मग रंगीत शाईने छाप उमटवून ही चित्रं केली आहेत.. शहरं/ गावं यांच्या आसपासची दृश्यं त्यात तुम्हाला दिसतील,’ असे सांगितले पाहिजे, याची योग्य जाण दामोदर पुजारे यांना होती.

वयाच्या ८६व्या वर्षी, सोमवारच्या पहाटे पुजारे यांचे निधन ठाणे येथे झाले. मध्यंतरी, २०१४ साली त्यांना पक्षाघातसदृश विकारही जडला होता. मात्र त्यातूनही ते सावरले आणि २०१७ साली जहांगीर कलादालनात त्यांच्या काही मुद्राचित्रांसह जुन्या रंगचित्रांचेही प्रदर्शन भरले होते. ‘प्रदर्शनाची तारीख मिळाल्याचा निरोप घेऊन मी सरांकडे गेलो तेव्हा आजारपण विसरून त्यांच्यात उत्साह संचारला’ – ही त्यांचे शिष्य, चित्रकार शिरीष मिठबावकर यांची आठवण त्या- अखेरचेच ठरलेल्या- प्रदर्शनाच्या वृत्तान्तात ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने नोंदविली आहे. हा आजार होण्यापूर्वी तर पुजारेसर उत्साहमूर्तीच होते.. ठाण्याच्या कापूरबावडी भागात तेव्हा नुकतेच सुरू झालेल्या ‘ठाणे कलादालना’तील २०१० सालच्या प्रदर्शनात त्यांचा सहभाग होता. त्याआधी आणि विशेषत: वयाच्या पासष्टीपर्यंत तर त्यांच्या कलाकृती मुंबई, दिल्ली, बेंगळूरु आदी अनेक शहरांत प्रदर्शित झाल्या. प्रदर्शनासाठी दालनाची तारीख स्वत:लाच मिळाली तरीदेखील अन्य कुणा प्राध्यापक-चित्रकाराच्या साथीनेच प्रदर्शन भरवण्यास ते प्राधान्य देत.

पुजारे यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वालावलचा. बालपणी घरातूनच गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचे धडे त्यांना मिळाले आणि हे कलाप्रेम जोपासत त्यांनी मुंबईच्या सर ज. जि. कला महाविद्यालयात प्रवेश मिळविला. कलाध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द आधी दादरचे मॉडेल आर्ट इन्स्टिटय़ूट आणि पुढे वांद्रे येथील (रहेजा) कला महाविद्यालय येथे बहरली.