12 July 2020

News Flash

डॉ. वशिष्ठ नारायण सिंह

गणितज्ञ हे काहीसे एकलकोंडे, स्वत:च्या विश्वात रमणारे असतात.

संग्रहित छायाचित्र

 

गणितज्ञ हे काहीसे एकलकोंडे, स्वत:च्या विश्वात रमणारे असतात. बिहारचे महान गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह याला अपवाद नव्हते. त्यांचा जन्म बिहारच्या सिवन जिल्ह्य़ातील वसंतपूरचा. वडील पोलीस खात्यात. त्यांच्या एकूण जीवनकहाणीकडे पाहिले तर गणितज्ञ जॉन नॅश यांची आठवण येते, पण पाश्चात्त्य जगात आधुनिक विद्वानांची जी कदर होते ती भारतात नाही. त्यामुळेही असेल, पण स्किझोफ्रे निया म्हणजे व्यक्तिमत्त्व दुभंगाच्या आजाराने हा प्रज्ञावंत अकालीच झाकोळला होता. १९६३ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते शिकण्यासाठी पाटणा विज्ञान महाविद्यालयात आले. तेथे ते ‘वैज्ञानिकजी’ नावानेच परिचित होते. महाविद्यालयात शिक्षकांच्या अनेक चुका ते दाखवून देत. त्यामुळे प्राचार्यावर वशिष्ठ यांची स्वतंत्र परीक्षा घेण्याची वेळही आली होती.

त्याच काळात अमेरिकी गणितज्ञ जॉन केली पाटण्यात व्याख्यानासाठी आले असता त्यांनी चार ते पाच गणिती कूटप्रश्न मांडले. श्रोत्यांपैकी वशिष्ठ यांनी चुटकीसरशी त्यांचे सगळे कूट प्रश्न सोडवले तेव्हा अवाक् झालेल्या केली यांनी त्यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण स्वखर्चाने दिले. कॅलिफोर्निया विद्यापीठातून वशिष्ठ यांनी १९६३ मध्ये ‘रिप्रोडय़ुसिंग केर्नेल्स अ‍ॅण्ड ऑपरेटर्स विथ सायक्लिक व्हेक्टर’ हा पीएचडीचा प्रबंध सादर केला. १९६९ मध्ये त्याच विद्यापीठात ते सहयोगी प्राध्यापक झाले. १९७३ मध्ये त्यांचा विवाह झाला, पण मनोदुभंगाने त्रस्त असलेल्या वशिष्ठ यांची साथ पत्नीने सोडली. त्यांनी आइनस्टाइनचा ‘ई इज इक्वल टू एमसी स्क्वेअर’ हा सिद्धांत खोडून काढला होता असे म्हणतात, पण त्याचे पुरावे नाहीत कारण तोपर्यंत त्यांना मनोदुभंग झालेला होता.

भारतात परतल्यावर त्यांनी आयआयटी कानपूर, टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई, भारतीय सांख्यिकी संस्था कोलकाता या संस्थांत काम केले. १९७४ मध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले, पण नंतर ते रेल्वेने पुण्यातील भावाकडे जात असताना ते बेपत्ता झाले आणि पाच वर्षांनी छाप्रा येथे कचराकुंडीजवळ सापडले. अनेक मानसोपचार संस्थांनी त्यांना दत्तक घेण्याची तयारी दर्शवली होती, पण त्यांच्या आईने परवानगी दिली नाही. दिग्दर्शक प्रकाश झा यांना वशिष्ठ यांच्यावर चित्रपट करायचा होता, पण त्यांच्या भावाने परवानगी नाकारली. पाटण्यातील एका अपार्टमेंटमध्ये चाळीस वर्षे ते मनोदुभंगाने पछाडलेल्या अवस्थेत जीवन जगले, तरी पुस्तके, पेन्सिल नेहमी त्यांच्या सोबतीला होती. त्यांच्या जाण्याने एका शापित प्रज्ञावंताची दुर्दैवी अखेर झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 1:35 am

Web Title: dr vashist narayan singh profile akp 94
Next Stories
1 राजेंद्र मेहता
2 रौला खलाफ
3 नारायण रेड्डी
Just Now!
X