नितीन करीर, भूषण गगराणी, तुकाराम मुंढे यांसारखे महाराष्ट्रातील काही सनदी अधिकारी असे आहेत ज्यांना कुठल्याही विभागात पाठवले तरी आपल्या कार्यशैलीने ते संबंधित विभागात आमूलाग्र सुधारणा घडवून तेथील कारभारात शिस्त आणतात. केंद्रीय स्तरावरही असे काही अधिकारी आहेत, जे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. त्यातील एक आहेत अश्विनी लोहानी! उत्तर प्रदेशात चार दिवसांच्या अंतराने रेल्वेचे दोन मोठे अपघात झाल्याने विरोधकांनी रेल्वेच्या कारभाराचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली. यामुळे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही राजीनामा देऊ केला. पंतप्रधान मोदी यांनी त्यांना वाट पाहण्यास सांगितले, मात्र त्याच दिवशी लोहानी यांना एअर इंडियाच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेण्यास सांगण्यात आले.

अत्यंत कर्तव्यकठोर अधिकारी अशी ओळख असलेले लोहानी आहेत मूळचे कानपूरचे. मेकॅनिकल इंजिनीअर असलेले लोहानी १९८० मध्ये भारतीय रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागात रुजू झाले. नोकरीत असतानाही त्यांचे शिक्षण सुरूच होते. अभियांत्रिकीच्या विविध शाखांतील चार पदव्या त्यांनी मिळवल्या आहेत. २००२ मध्ये त्यांना केंद्र सरकारच्या आग्रहामुळे आपल्या करिअरचा मार्ग बदलावा लागला. ते भारतीय पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बनले. मंडळाचे दिल्लीतील अशोका हे नामांकित हॉटेल अनेक वर्षे तोटय़ात का चालले याचा त्यांनी बारकाईने अभ्यास करून योग्य त्या उपाययोजना केल्या. काही वर्षांतच या हॉटेलला गतवैभव त्यांनी प्राप्त करून दिले. कोणता पक्ष सत्ताधारी आहे, याची चिंता न करता नियम व कायद्याच्या चौकटीत काम करणे, हे त्यांचे वैशिष्टय़ असल्याने सर्व पक्षांतील नेत्यांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत. त्यामुळेच मध्य प्रदेशातील पर्यटनाला घरघर लागत असल्याचे पाहून उमा भारती यांनी त्यांना मध्य प्रदेश पर्यटन महामंडळात आणले. ‘एमपी अजब है, सबसे ग्मजब है’ हे आकर्षक घोषवाक्य घेऊन त्यांनी आक्रमक पद्धतीने या पर्यटन महामंडळाची मोहीम माध्यमांतून राबवली. अनेक रिसॉर्ट व हॉटेलांशी करार करून मध्य प्रदेशातील ऐतिहासिक स्थळांकडे पाठ फिरवणाऱ्या पर्यटकांना परत राज्याकडे खेचून आणले. नंतर ते पुन्हा रेल्वे विभागात गेले. सिंहस्थ पर्वणीच्या निमित्ताने गतवर्षी ते एका परिसंवादासाठी उज्जन येथे आले असता मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यांना पर्यटन व शिक्षण विभागांची जबाबदारी घेण्यासाठी पुन्हा राज्यात येण्याचे जाहीर आवाहन केले होते, यातूनच त्यांचे कर्तृत्व अधोरेखित व्हावे.

रेल्वे बोर्डाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेक अधिकारी, ठेकेदार पुष्पगुच्छ, मिठाई घेऊन आलेले बघताच लोहानी यांनी ‘मला व्हीआयपी संस्कृती अजिबात मान्य नाही’, असे खडे बोल सुनावून त्यांना तडक बाहेरचा रस्ता दाखवला. दिवाळी वा अन्य कोणत्याही सणांच्या निमित्ताने कार्यालयात मिठाई वा भेटवस्तू कुणीही स्वीकारायच्या नाहीत असा फतवाच त्यांनी मग काढला. याआधी ते दिल्लीतच रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक होते तेव्हाही त्यांची कार्यशैली अशीच कडक होती, हे बोर्डातील जुने अधिकारी आवर्जून सांगतात. एअर इंडियात असताना मिथुन रेड्डी, रवींद्र गायकवाड यांसारख्या संसद सदस्यांनी कर्मचाऱ्यांवर हात उगारताच ते कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. दिल्लीतील तीनही रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलून टाकण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या निवृत्तीला आणखी दोन वर्षे असल्याने रेल्वेचा ढेपाळलेला कारभार पुन्हा रुळांवर आणण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे.