News Flash

एमजीके मेनन

१९२८ मध्ये मंगळुरू येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील जिल्हा व सत्र न्यायाधीश होते.

स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, अणुवैज्ञानिक होमी भाभा यांच्या मुशीत घडलेले भौतिकशास्त्रज्ञ, अनेक वैज्ञानिक संस्थांची धुरा वाहणारे खंदे वैज्ञानिक नेतृत्व अशी एमजीके मेनन यांची खरी ओळख. त्यांचे नाव माबिलीकलाथिल गोविंद कुमार मेनन असे लांबलचक होते, पण त्यांचे मित्र त्यांना गोकू म्हणत व लहान मुलांसाठी ते गोकूदादा होते. त्यांच्या निधनाने भारताचा विज्ञान क्षेत्रातील मोठा आधार निखळला आहे.

१९२८ मध्ये मंगळुरू येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील जिल्हा व सत्र न्यायाधीश होते. पंजाब विद्यापीठातून मॅट्रिक केल्यानंतर ते आग्रा विद्यापीठातून विज्ञानाचे पदवीधर झाले. नंतर जोधपूरच्या जसवंत कॉलेजमध्ये त्यांनी वैद्यकाचा पाठपुरावा केला. सर सी. व्ही. रामन यांच्या प्रेरणेतून ते विज्ञान क्षेत्रात आले. मुंबईच्या रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेत त्यांनी भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली त्या वेळी एन. आर. तावडे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. १९५३ मध्ये ते ब्रिस्टॉल विद्यापीठातून पीएच.डी. झाले. तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थिनी असलेल्या इंदुमती पटेल यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. १९५५ मध्ये ते टाटा मूलभूत संशोधन संस्थेत आले ते भाभा यांच्या आग्रहास्तव. त्या वेळी ही संस्था नुकतीच बंगळुरूहून मुंबईत हलवली होती. १९६६ मध्ये विमान अपघातात भाभा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तेव्हा टाटा मूलभूत संस्थेच्या संचालकपदी जेआरडी टाटांनी मेनन यांची नेमणूक केली. त्या वेळी ते अवघे ३८ वर्षांचे होते. १९७५ पर्यंत ते या संस्थेचे संचालक होते. विक्रम साराभाई यांच्या निधनानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आग्रहास्तव भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे अध्यक्ष म्हणून त्यांनी १९७२ मध्ये नऊ महिने काम केले. कोलारच्या खाणीत वैश्विक किरणांचा अभ्यास करून मूलभूत कणांचे गुणधर्म शोधण्याचा जो प्रयोग करण्यात आला त्यात मेनन हे प्रेरणास्थान होते. प्लास्टिकचे बलून तयार करून त्यातून पेलोड सोडण्याची कल्पना त्यांनीच टाटा मूलभूत संशोधन संस्थेत असताना मांडली होती. या संस्थेत असतानाच थोर संशोधक सी. व्ही. रामन यांनी मेनन यांना रामन ट्रस्टवर नेमले होते. त्यामुळे रामन यांच्या निधनानंतर रामन रिसर्च इन्स्टिटय़ूटची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर पडली. अनेक विज्ञान संस्थांचे नेतृत्व त्यांनी केले. ते खासदार व मंत्रीही होते. लंडनची रॉयल सोसायटी, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थांचे ते फेलो होते. वैश्विक किरणांच्या संशोधनासाठी त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्था व डय़ुरहॅम विद्यापीठ तसेच ओसाका विद्यापीठ यांच्यात सहकार्य घडवून आणले होते. इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसची प्रकाशने वाढवण्यात त्यांचा पुढाकार होता. नंतर प्रोसिडिंग व प्रेरणा तसेच जेनेटिक्स ही संशोधनावर आधारित प्रकाशने त्यांनी सुरू केली. देशाच्या विज्ञान क्षेत्राच्या धोरणात्मक जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 2:45 am

Web Title: m g k menon
Next Stories
1 शरद कुलकर्णी
2 के. सूर्यनारायण राव
3 डॉ. डेन्टन कुली
Just Now!
X