‘भारतीय रेडिओ-खगोलशास्त्राचे जनक’ अशी  ख्याती असलेले, लहर-संवेदनांतून खगोल अभ्यास करणारे प्रा. गोविंद स्वरूप सोमवारी (७ सप्टेंबर) पुण्यात निवर्तले; त्यानंतर जगभरातून येत असलेल्या शोकसंदेशांमुळे त्यांच्या जगन्मान्य कर्तृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे. त्याआधीच, गेल्या मार्चमध्ये पुण्यात त्यांच्या नव्वदीनिमित्त जागतिक खगोलशास्त्रज्ञांची खास परिषद झाली होती तेव्हा आणि ब्राझीलच्या राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे ‘गोविंद स्वरूप मेडल’ हा त्रवार्षिक पुरस्कार गेल्या वर्षीपासून सुरू झाला तेव्हाही- त्यांच्या कर्तृत्वाचे तेज दिसले होते. खगोलशास्त्राखेरीज, भारतीय विज्ञान-शिक्षण संस्थांचा विकास आणि गोविंद स्वरूप यांचे नाते अप्रत्यक्ष असले, तरी तेही लक्षणीय आहे. ‘यूपी’च्या (तत्कालीन युनायटेड प्रॉव्हिन्स) ठाकुरद्वारा नामक खेडय़ात १९२९ साली जन्मलेले गोविंद स्वरूप अलाहाबादच्या ख्रिश्चन कॉलेजात शास्त्रशाखेत पदवी शिक्षण घेतात, अलाहाबाद विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेऊन १९५० मध्ये दिल्लीच्या ‘राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळे’त दाखल होतात, तेथून ब्रिटन व अमेरिकेत शिक्षणासाठी जाऊन पुन्हा मायदेशी येतात ते मुंबईच्या ‘टाटा मूलभूत विज्ञान केंद्रा’त होमी भाभांच्या निमंत्रणावरून ‘रेडिओ-खगोलशास्त्र गट’ स्थापण्यासाठी आणि तेव्हापासून भारतातील अनेक खगोलशास्त्रज्ञांना घडवत सुरू राहिलेले त्यांचे कार्य पुणे जिल्ह्यत जुन्नरजवळील ‘जीएमआरटी’ लहर-संवेदन दुर्बिणीच्या स्थापनेमुळे अतुलनीय उंची गाठते; त्यानंतर पुण्यात ‘आयुका’च्या स्थापनेची संकल्पना वेग घेते.. ही कहाणी भारतीय विज्ञान-शिक्षणात काही खोट नाही, हेच सांगणारी आहे. अर्थात, आणखी बराच पल्ला गाठायचा आहे, याची जाण प्रा. स्वरूप यांनाही होती. २००६ पासून स्थापन झालेल्या ‘विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थां’मध्ये (आयआयएसईआर) तरुणांना  संशोधनास प्रोत्साहन कसे देता येईल, याचा आराखडा प्रा. स्वरूप यांनी अलीकडे दिला होता.

खगोलशास्त्रातील त्यांचे कार्य ‘टाइप यू सोलर रेडिओ बर्स्ट’ यासारख्या शास्त्रीय भाषेत मांडणे गहन आणि अनेकांना अनाकलनीय ठरेल. पण सौरलहरींचे परावर्तन या अभ्यासविषयात त्यांचे संशोधन जगात मोलाचे मानले जाते. या परावर्तनातून पुढे, आकाशगंगांचे नकाशे काढता येतात! ‘रेडिओ खगोलशास्त्र’ ही अभ्यासशाखा १९३५ पासून सुरू झाल्याचे मानले जाते, पण भारतात- किंबहुना तेव्हाच्या अविकसित देशांत- त्याची सक्रिय सुरुवात करण्याचे श्रेय स्वरूप यांचेच. ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांखेरीज केनिया, इंडोनेशियातही त्यांनी काही प्रयोग केले होते. लहर-संवेदनाच्या ‘दुर्बिणी’ अ‍ॅन्टेनांच्या समूहांसारख्या असतात, तशी भारतातील पहिली दुर्बीण (२४ अ‍ॅन्टेनांचा समूह) १९६५ साली कल्याणनजीक ‘टाटा मूलभूत संशोधन संस्थे’मार्फत त्यांनी उभारली. पुढे उटी आणि पुणे (जुन्नर) येथील दुर्बिणी उभारताना नव्या   विश्लेषणतंत्राला न्याय देणारे तंत्रज्ञान त्यांनी वापरले. हे सारे अर्थातच, भारतावरील त्यांच्या अदम्य विश्वासातूनच शक्य झाले होते!