चित्रकार शमशाद हुसेन यांचे निधन, अशी बातमी देताना अनेक वृत्तपत्रांनी, ‘मकबूल फिदा हुसेन यांचे पुत्र शमशाद कालवश’ असे म्हटले आहे. जी ओळख स्वत:च्या चित्रांमधून पुसून टाकण्यात शमशाद हुसेन जिवंतपणी यशस्वीच झाले होते, ती अनेकदा त्यांना विनाकारण चिकटवली जाई. मृत्यूने २५ ऑक्टोबरच्या रविवारी सकाळी त्यांना गाठले, त्यानंतरही तीच ओळख अखेर चिकटून राहिली. चित्रकार म्हणून शमशाद हे हुसेन यांचे नातलग नव्हतेच.. उलट क्रिशन खन्ना, एके काळचे विवान सुंदरम आणि काही प्रमाणात लक्ष्मा गौड हे त्यांच्या चित्रविचाराचे सहोदर. ‘हुसेन’ असले तरी शमशाद हुसेन यांचे चित्र वेगळे आहे, हे सामान्यजनांनाही झटकन कळेल अशीच शमशाद यांच्या चित्रांची दृश्यवैशिष्टय़े होती. म्हणजे एमएफ हुसेनांची चित्रे रंगीबेरंगी आणि पिवळा, भडक लाल किंवा आकाशी-निळा अशा रंगांना प्राधान्य देणारी, तर शमशाद यांची चित्रे काळ्या- करडय़ा छटांची. वडिलांच्या चित्रांत रेषांतून केवळ सूचक भावदर्शन, तर शमशाद यांच्या चित्रांमध्ये भावदर्शन आणि त्यामागची मन:स्थिती, त्याहीमागचा माणूस आणि मानवी जीवनाचे दशावतार जाणून घेण्याची कळकळ. ही कळकळ साकार व्हायची ती लहान लहान, पण ठाम फटकाऱ्यांनी केलेल्या रंगकामातून. हे फटकारेच चित्राला गोलाई देत. म्हणजे, एखाद्या गरीब मातेची वर आलेली गालफडे आणि खोल गेलेले डोळे हे सारे या छोटय़ा फटकाऱ्यांतून दिसे. त्या डोळ्यांत काय वाचायचे आहे, याची कल्पना प्रेक्षकाला चित्रातले अन्य घटक पाहून आलेली असायचीच.. अशा चित्रांची पाश्र्वभूमी थोडय़ा हलक्या छटेच्या करडय़ा रंगाची असली, तरी त्यातील फटकारेही सर्वत्र सारखे नसत. चित्राच्या वरच्या एखाद्याच कोपऱ्यात तर ते विरळ होत आणि जणू एखादा करुण प्रसंग सांगून झाल्यावर, सांगणाऱ्याने सुस्कारा सोडून मध्येच गप्प व्हावे, तसा अनुभव शमशाद यांनी सोडून दिलेली ती पोकळी पाहणाऱ्याला येई.
‘माणसाची स्थिती चित्रातून दाखवणे महत्त्वाचे’ असे मानणारे शमशाद, बहुतेकदा करुण- शांत किंवा संघर्षांतील सहनशीलतेच्या मानवी स्थितीची चित्रे करीत. बडोदे येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठातील पदवी शिक्षण, पुढे ब्रिटनमध्ये रॉयल कॉलेज ऑफ आर्टमध्ये पदव्युत्तर शिक्षण, १९८३ सालचा राष्ट्रीय (ललितकला) पुरस्कार आणि त्याच वर्षी केंद्र सरकारची फेलोशिप, असा प्रवास करीत १९८८ पर्यंत शमशाद यांची २८ कलाप्रदर्शने झाली, त्यांपैकी निम्मी परदेशात होती. १९९० नंतर मात्र कलाक्षेत्रच बदलू लागले, त्याचा विषाद वाटणाऱ्या शमशाद यांची नैराश्याकडे वाटचाल सुरू झाली व अखेर यकृताच्या कर्करोगास ते बळी पडले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Oct 2015 रोजी प्रकाशित
शमशाद हुसेन
चित्रकार शमशाद हुसेन यांचे निधन, अशी बातमी देताना अनेक वृत्तपत्रांनी, ‘मकबूल फिदा हुसेन यांचे पुत्र शमशाद कालवश’ असे म्हटले आहे.
Written by रत्नाकर पवार

First published on: 27-10-2015 at 02:07 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashad hussain profile