सलग दोन वर्षे ‘महाराष्ट्र केसरी’, दीनानाथसिंग यांच्यासारख्या पैलवानाला एका मिनिटात गारद करून ‘रुस्तम-ए-हिंद’, त्यानंतर दिल्लीच्या नेत्रपाल यांना ‘ढाक’ डाव टाकून मिळवलेला ‘महानभारत केसरी’ हे किताब १९७४ च्या दशकात दादू चौगुले यांनी मिळवलेच; पण १९७४ मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही भारताला त्यांनी रौप्यपदक मिळवून दिले. ‘ध्यानचंद पुरस्कार’ त्यांना २०१८ मध्ये मिळाला तेव्हा कोल्हापूरचीच नव्हे तर महाराष्ट्राची शान वाढली.. पण आणखी मल्ल घडवण्याची रग बाकी असतानाच हृदयविकाराचा झटका आला आणि दादू चौगुले आयुष्याच्या आखाडय़ातून ओढले गेले.
आधी निष्ठा, मग मेहनत आणि मग कौशल्य हे कोणत्याही खेळातील प्रावीण्यासाठी आवश्यक असणारे तिहेरी भांडवल दादू चौगुले यांच्याकडे भरपूर होते. कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाडा या त्या वेळी दुर्गमच असलेल्या गावात १९४८ साली जन्मलेल्या दादू यांनी बालपणीच कुस्तीचा छंद जपला. अंगाने आडमाप असल्यामुळे कुस्त्या जिंकल्यादेखील. मग वडिलांनी त्यांना कोल्हापुरास नेले आणि गुरू ‘हिंदकेसरी’ गणपतराव आंदळकर यांच्या हवाली केले. कोल्हापूर ही कुस्तीपंढरी खरीच, पण इथल्या कुस्त्या लाल मातीवरच्या. १९७० च्या दशकारंभी दादू यांनी लाल मातीवरील कुस्त्यांमध्ये निर्विवाद प्रभुत्व सिद्ध केलेले असले, तरी भारताचे प्रतिनिधित्व परदेशांमध्ये- आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये करण्यासाठी मॅटवरील कुस्त्यांचा सराव आवश्यक होता आणि त्यासाठी कोल्हापूर सोडणे भाग होते. न्यूझीलंडमधील राष्ट्रकुल खेळांच्या चमूतील समावेशाची संधी चालून आली, पण वजन १२० किलोहून अधिकच असल्यामुळे ती हातची जाणार की काय, अशीही शंका होती. या आव्हानांवर पंचविशीतल्या दादूंनी मात केली. वजन तर घटविलेच, पण मॅटवर सरावही केला. युक्तीने कुस्ती खेळणे, ही दादू यांची खासीयत. म्हणूनच तर, जलद कुस्ती करणारा अशी ख्याती त्यांनी मिळवली होती. शक्ती-युक्तीचे हे एकत्रित बळ न्यूझीलंडच्या ख्राइस्ट चर्च येथील राष्ट्रकुल स्पर्धेच्या मॅटवरही दिसले. तिथे हेवीवेट गटात दादूंना रौप्यपदक मिळाले, तर त्याच वर्षी रघुनाथ पवार यांनी अन्य (वेल्टरवेट) गटात सुवर्णपदक मिळवले होते. यशाच्या या शिखरानंतर दादू इतरांचे मार्गदर्शकही झाले. कुस्तीगिरांची पुढली पिढी घडवण्याचे काम ‘दादूमामा’ म्हणून अधिक परिचित झालेल्या दादूंनी केले. अनेक विजेत्यांना युक्तीचा मंत्र दिला. दादू यांच्या दोघा कुस्तीगीर पुत्रांपैकी विनोद हेही ‘हिंदकेसरी’ ठरले. कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत घडलेले आणि पुढे याच तालमीत इतरांना घडवणारे मल्ल दादू चौगुले यांची उणीव यापुढेही जाणवत राहील.