या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात फोरस्ट्रोक कम्युटिंग मोटरसायकल सेगमेंटची सुरुवात तत्कालीन हीर-होंडा कंपनीच्या माध्यमातून सुरू झाली. या कंपनीने ८०च्या दशकात लाँच केलेल्या सीडी १००, सीडी १०० एसएस या मोटरसायकलना सर्व प्रकारच्या ग्राहकवर्गाकडून प्रतिसाद मिळाला. काळानुसार या मोटरसायकलमध्ये बदल होत गेले. पुढे जाऊन हीरो आणि होंडा कंपनी विभक्त झाल्या. कंपनीतील करारानुसार सीडी हा ब्रॅण्ड होंडा कंपनीकडे गेला. त्यामुळे सीडीअंतर्गत लाँच केलेल्या मोटरसायकलचे रिब्रॅण्डिंग वा पूर्णपणे नव्या ब्रॅण्डची मोटरसायकल लाँच करण्याचा पर्याय हीरो मोटोकॉर्पकडे राहिला. यातून हीरो एचएफ डीलक्स मोटरसायकलचा जन्म झाला. यामध्ये प्रामुख्याने ग्राणीव व निमशहरी तसेच मर्यादित बजेट असणाऱ्या सर्व वयोगटातील ग्राहकांना आकर्षित करण्याचा हेतू होता. त्यामुळेच मोटरसायकलची रचना भावेल, अशीच करण्यात आली आहे. यामध्ये क्रोमचा वापर न करता (पूर्वीच्या सीडी मॉडेलची खासीयत होती) फायबरचा वापर अधिक करण्यात आला आहे. त्यामुळे मोटरसायकलचा लुक अधिक सुधारला आहे. पहिल्या मोटरसायकला हेड लाइट हा पारंपरिक पद्धतीमधील आयताकृती व क्रोम फिनिश असलेला होता. त्यामध्ये सुधारणा करून तो सेमी स्पोर्टी काऊल लुक असणारा बसविण्यात आला आहे. त्यामुळेच मोटरसायकल अधिक आकर्षक झाली आहे. अर्थात, मोटरसायकलचा लुक बदलताना त्यातील इंजिनही बदलले गेले आहे.

एचएफ डीलक्सला १०० सीसी (९७.२)चे सिंगल सिलिंडरचे एअर कूल्ड इंजिन बसविण्यात आले आहे. तसेच, चार गिअर असून, पॉवर ८.३६ आहे. नव्या एचएफ डिलक्सला कंपनीने आयथ्रीस एस हे तंत्रज्ञान दिले आहे. यामुळे इंधनाची बचत होते, असे कंपनीचे म्हणणे आहे. या मोटरसायकलचे बेसिक मॉडेल किक स्टार्टमध्ये उपलब्ध आहे. इंजिन स्मूथ असून, ताशी ६० किमीच्या वेगास व्हायब्रेशन्स जाणवत नाहीत. त्यानंतर अधिक वेग वाढल्यास हळूहळू आवाज व व्हायब्रेशन्स जाणवू शकतात. उत्तम मायलेज मिळण्यासाठी ताशी ६० किमी वेग (परिस्थितीनुसार) योग्य ठरू शकतो.

मोटसायकलचे सीट फ्लॅट स्वरूपाचे असले तरी ते मोठे व आरामदायी आहे. पुढील चाकास टेलिस्कोपिक हायड्रॉलिक व मागील चाकास दोन स्टेपमध्ये अडजेस्ट करता येणारे हायड्रोलिक सस्पेन्शन दिले आहे. सस्पेन्श चांगली असून, खडबडीत रस्त्यावर कमी दणके बसतात. मोटरसायकलला मागील व पुढील चाकास अलॉय व्हील देण्यात आले आहेत. त्यामुळे सौंदर्यात अधिक भर पडते. तसेच, स्पोक व्हीलच्या तुलनेत अलॉय व्हील अधिक दणकट असतात. मोटरसयाकलच्या हेटलॅप हा ऑलवेज हेडलॅम्प ऑन फीचरसह दिला आहे. मोटरसायकचा एक्झॉस्ट ब्लॅक फिनिशचा असून, त्यास क्रोमफिनिशचा मफलर दिला आहे. त्यामुळे मोटरसायकल खुलते.

कम्युटर मोटरसायकलसाठी मायलेज फार महत्त्वाचे असते. कारण, या सेगमेंटमधील ग्राहकाला अधिकाधिक पॉकेटफ्रेंडली गाडी हवी असते. त्यामुळे कंपन्या मोटरसायकलचे मायलेज प्रति लिटर साठ ते सत्तर किमीपेक्षा अधिक कसे राहील, यावर अधिक भर देतात. एचएफ डीलक्स मोटरसायकल प्रति लिटर ८० किमीचे मायलेज देते, असा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात एवढे मायलेज मिळेलच असे नाही. पण, मोटरसायकल लाइटवेट असल्याने नक्कीच ते चांगले मिळण्याची अपेक्षा आहे.

मोटरसायकलमध्ये बेसिक कलरबरोबर ग्राफिक्सची जोड दण्यात आली आहे. तसेच, कम्युटर प्रीमियम मोटरसायकलसारखे ग्रॅबरेल, क्रिस्टल क्लीअर इंडिकेटरही देण्यात आले आहे. त्यामुळेच मोटरसायकलचा लुक कम्युटर सेमेंटमधील प्रीमियम मोटरसायकलसारखा असल्याचे जाणवते. बजेट पन्नास ते पंच्चावन्न असणऱ्यांसाठी ही मोटरसायकल नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकते. एचएफ डीलक्स ही आयथ्रीएस मॉडेलव्यतिरिक्तही उपलब्ध आहे.

obhide@gmail.com

मराठीतील सर्व व्हीलड्राइव्ह बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero motocorp hf deluxe
First published on: 20-10-2017 at 00:49 IST